तुळजाभवानी मातेची शेषशाही अलंकार महापूजा  Pudhari Photo
सोलापूर

लाखो भाविकांची मातेच्या दर्शनासाठी गर्दी

पुढारी वृत्तसेवा

तुळजापूर : संजय कुलकर्णी

महाराष्ट्राची कुलस्वामिनी तथा शक्तिदेवता श्री तुळजाभवानी मातेची बुधवारी (9 ऑक्टोबर) सातव्या माळेला शेषशाही अलंकार महापूजा बांधण्यात आली. गेल्या तीन दिवसांपासून मातेच्या विविध अवतार पूजा बांधण्यात येत असून मुख, धर्म दर्शनाच्या निमित्ताने लाखो भाविकांना ‘याचि देही, याचि डोळा’ भरून मातेच्या विशेष अवतार महापूजा पाहण्याचे सौभाग्य लाभत आहे. शारदीय नवरात्रौत्सवात मातेचे मुख, धर्म दर्शन, स:शुल्क दर्शन त्याचबरोबर अभिषेक पूजा दर्शनासोबत अवतार महापूजेचे दर्शन घेऊन भाविक धन्य होताना दिसत आहेत. सर्व पूजाविधीचे प्रकार यंदाच्या नवरात्रौत्सवात प्रथा, परंपरेनुसार सुरू असल्याने दूरदूरचे भाविक तुळजापूर गाठून मातेच्या महाद्वारात श्रीफळ वाढवून कुलधर्म, कुलाचाराचा श्रीगणेशा करताना दिसत आहेत. मातेने शुंभ, नीशुंभ दैत्यांचा वध केला म्हणून शेषशय्या नवरात्र महोत्सवातील बुधवारी सातव्या माळेला श्री तुळजाभवानी मातेची शेषशाही अलंकार महापूजा बांधण्यात आली.

या विशेष अवतार महापूजेचे महत्त्व असे की, भगवान विष्णू क्षीर सागरामध्ये शेषशय्येवर विश्रांती करीत होते. तेव्हा मातेने त्यांच्या नेत्र कमळात विश्राम घेतला. यावेळी भगवान विष्णूंच्या दोन्ही कानातील मळातून शुंभ, निशुंभ हे दोन दैत्य निर्माण झाले. तेव्हा शेष शय्येवरील विष्णूंवर त्यांनी आक्रमण करण्यास सुरुवात केली.तेंव्हा विष्णूंच्या नाभी कमलात विश्राम घेणार्‍या ब्रह्मदेवांनी देवीची स्तुती करीत मातेला जागे केले आणि या दैत्यांचा नाश करण्याची विनंती केली. त्यानंतर देवीने या दोन दैत्यांचा वध केला म्हणून भगवान विष्णूंनी आपली शेषशय्या मातेला अर्पण केली. त्या क्षणाची आठवण म्हणून देवीची शेषशाही अलंकार महापूजा बांधण्यात येते.

श्रीफळ व केळीचे भाव गगनाला

तुळजापुरात श्रीफळ, केळी वाढीव दराने विक्री होत असल्याने मातेच्या भक्तांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मातेची ओटी भरण्यासाठी श्रीफळ, केळी या वस्तू आवश्यक असल्याने भाविकांना चढ्या दराने त्या खरेदी कराव्या लागत आहेत. शारदीय नवरात्र महोत्सवापूर्वी श्रीफळ 25 रुपयाला मिळत होता, मात्र सध्या एका श्रीफळाची किंमत 40 रुपये झाली आहे. केळीचे दरही 30 रुपये डझनवरून 40 ते 50 रुपये झाले आहेत. या दोन्ही वस्तू मातेच्या ओटी भरण्यासाठी आवश्यक असल्याने ते खरेदी केल्याशिवाय भाविकांकडे पर्याय नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT