Mahapure couple on a two-wheeler killed after being hit by an ST bus
मोहोळ : पुढारी वृत्तसेवा शेतात मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी येथील महापुरे कुटुंबावर काळाने घाला घातला. मोहोळ शहरानजीक चंद्रमौळी औद्योगिक वसाहतीजवळ एसटी बसने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात शिवाजी आप्पा महापुरे यांचा सोमवारी मृत्यू झाला होता. तर गंभीर जखमी झालेल्या त्यांच्या पत्नी कल्पना शिवाजी महापुरे (वय ५२) यांचाही आज मंगळवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. काही तासांच्या अंतराने पती-पत्नीचा मृत्यू झाल्याने महापुरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून मार्डी गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास शिवाजी आप्पा महापुरे हे पत्नी कल्पना यांच्यासह दुचाकीवरून मोहोळ येथे मुलीला भेटण्यासाठी निघाले होते. त्यांची दुचाकी (क्र. एमएच १३ एएच ५८९६) मोहोळ शहरानजीक चंद्रमौळी औद्योगिक वसाहतीजवळ आली असता तुळजापूर- मेढा धावणाऱ्या एसटी बस क्र. एमएच १४ बीटी ४८४१ ने त्यांच्या दुचाकीला भरधाव वेगात जोरदार धडक दिली.
या अपघातात शिवाजी महापुरे यांचा मोहोळ येथे उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. तर पत्नी कल्पना महापुरे या गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी सोलापूर येथे हलविण्यात आले होते. मात्र, मृत्यूशी सुरू असलेली त्यांची झुंज मंगळवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास अपयशी ठरली. उपचारादरम्यान त्यांचीही प्राणज्योत मालवली. महापूरे दाम्पत्याचा अशा दुर्दैवी पद्धतीने अंत झाल्याने महापुरे कुटुंबाचा आधारच हरपला आहे. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुली, दोन विवाहित मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. या अपघाताचा पुढील तपास अपघात पथकाचे अंमलदार अतुल क्षीरसागर करीत आहेत.
सर्व्हिस रस्त्याअभावी दुचाकीस्वारांचा जीव धोक्यात!
पाकणी ते शेटफळदरम्यान सर्व्हिस रस्त्याची मागणी; प्रशासनाच्या उदासीनतेमुळे अपघातांचा धोका कायम आहे. सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गाच्या निर्मितीपासून मोहोळ तालुक्याच्या हद्दीतील पाकणी ते शेटफळ या दरम्यान सर्व्हिस रस्त्याचा प्रश्न प्रलंबित आहे. या मार्गावर सर्व्हिस रस्ता नसल्याने स्थानिक नागरिक, शेतकरी आणि दुचाकीस्वारांना नाईलाजाने राष्ट्रीय महामार्गावरूनच प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे मुख्य मार्गावरून वेगाने धावणाऱ्या अवजड वाहनांसोबत दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
या परिसरात वारंवार अपघात होत असतानाही सर्व्हिस रस्त्याचा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नाही. लोकप्रतिनिधी तसेच शासनदरबारी वेळोवेळी मागणी करूनही ठोस कार्यवाही होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. चंद्रमौळी औद्योगिक वसाहतीजवळ घडलेल्या या भीषण अपघाताने पुन्हा एकदा सर्व्हिस रस्त्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आणखी किती निष्पाप नागरिकांचे बळी गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित प्रशासनाने या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल घेऊन पाकणी ते शेटफळदरम्यान सर्व्हिस रस्त्याचे काम मार्गी लावावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.