

सोलापूर : आयुष्मान भारत योजनेच्या अंमलबजावणीत सोलापूर जिल्ह्याने प्रगती केली असून आतापर्यंत १८ लाख लाभार्थ्यांची आयुष्मान कार्ड जनरेट झाली आहेत. जिल्ह्यातील एकूण ४० लाख ९१ हजार लाभार्थ्यांपैकी ही संख्या सुमारे ४५ टक्के आहे.
गेल्या आठ ते नऊ महिन्यांत जिल्ह्यातील ७७ हजार ५०२ रुग्णांनी या योजनेचा लाभ घेतला असून, त्यांच्यासाठी २३२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून वितरित करण्यात आला आहे, अशी माहिती आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश शेटे यांनी दिली. सोलापुरातील रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
महापालिका क्षेत्रातील रुग्णालयांच्या सहभागाबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. शहरात सुमारे २०० रुग्णालये असताना केवळ १९ रुग्णालये आयुष्मान भारत योजनेत सहभागी आहेत. त्यामुळे अधिकाधिक रुग्णालयांनी या योजनेत सहभागी होण्याची गरज आहे. यासाठी महापालिका आयुक्त ओम्बासे यांनी शहरातील रुग्णालयांची बैठक घेऊन त्यांना योजनेत सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना दिल्या आहेत.
गरज भासल्यास सक्तीनेही रुग्णालयांचा सहभाग वाढवावा, असे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय खासगी रुग्णालयांमध्ये योजनेच्या लाभार्थ्यांसाठी किमान २५ टक्के खाटा राखीव ठेवण्याबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत. या पत्रकार परिषदेस सोलापूर महानगरपालिकेच्या कामगार कल्याण व समाजकल्याण समितीच्या सभापती श्रद्धा पवार, विकास वाघमारे आदी उपस्थित होते.