Inmate criminal killed in police encounter at Lamboti in Mohol taluka
सोलापूर : पुढारी वृत्तसेवा
मोहोळ तालुक्यातील लांबोटी येथे पुणे जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार पोलिसांच्या चकमकीत ठार झाला. शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख (राहणार - गल्ली नंबर 23 / ए, सय्यद नगर हडपसर पुणे) असे पोलिसांच्या चकमकीत ठार झालेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.
शाहरुख शेख याच्यावर पुणे शहर आणि जिल्ह्यातील हडपसर, वानवडी, कोंढवा, काळेपडळ या पोलीस ठाण्यांमधून सुमारे 15 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. मोका च्या गुन्ह्यात शेख हा फरार होता.
पुणे क्राईम ब्रांचच्या पथकाला शेख हा लांबोटी येथील त्याच्या नातेवाईकांच्या घरी असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून पुणे क्राईम ब्रांचच्या पथकाने मोहोळ पोलीस ठाण्याच्या मदतीने लांबोटी येथे (शनिवार) रात्री शेख याला पकडण्यासाठी संयुक्त मोहीम राबविली होती.
यावेळी पोलीस आपल्याला पकडण्यासाठी आल्याचे दिसताच शेख याने पोलिसांवर त्याच्याकडील पिस्तुलाने गोळीबार केला. त्यामुळे पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारामध्ये शेख याचा मृत्यू झाला. याची माहिती मिळताच सोलापूर ग्रामीण जिल्ह्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मोहोळ पोलीस ठाणे येथे भेट दिली.