सोलापूर

सोलापूर : सरपंचपदासाठी 209 तर सदस्यासाठी 863 अर्ज दाखल; उद्या शेवट दिवस 

दिनेश चोरगे

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील विविध तालुक्यातील जवळपास 189 ग्रामपंचायत निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यासाठी 28 नोव्हेबर पासून अर्ज मागविण्यात येत होते. आजअखेर 189 गावच्या सरपंचपदासाठी 209 तर सदस्यांच्या 646 जागेसाठी 863 अर्ज दाखल झाले आहेत.

2 डिसेंबरला (शुक्रवारी) अर्ज दाखल करण्याचा शेवट आहे. अशा परिस्थितीत सर्व्हर डाऊनच्या समस्येमुळे अर्ज अपलोड होत नसल्याने भावी सरंपच सदस्यांचा जीव टांगणीला लागला आहे. अनेक राजकीय पक्षांनी ऑफलाईन अर्ज स्विकारण्याची मागणी केल्यानंतर निवडणूक आयोगाने आता ऑफलाईन अर्ज स्विकारण्याची परवानगी दिली आहे. याबरोबरच  (शुक्रवारी) 2 डिसेंबर रोजी दुपारी 3 पर्यंत अर्ज स्वीकारण्याची शेवटची मुदत होती ती बदलून सायंकाळी साडेपाच पर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे उमेदवाऱ्यांनी सुटकेचा श्‍वास सोडला आहे. जिल्ह्यातील 11 तालुक्यातील जवळपास 15 ते 20 गावच्या निवडणूका या टप्यात होत असल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यासाठी तहसील कार्यालयात अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी वाढली आहे.

सरपंचपद थेट जनतेतून निवडले जाणार असल्याने महत्त्वाच्या ग्रामपंचायतीच्या ठिकाणी चुरस पहायला मिळत आहे. त्यामुळे सदस्यासाठी फारसे स्वारस्य लोकांना राहिलेले नाही. उद्या शेवटच्या दिवस असल्याने आज अर्ज किती दाखल होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. तसेच यासाठी 7 डिसेंबर रोजी अर्ज माघार घेण्याचा शेवट दिवस आहे.त्यामुळे कोणकोणत्या गावात दुरंगी लढत होणार अथवा कोणत्या ग्रामपंचायती बिनविरोध होणार हे 7 डिसेंबरलाच स्पष्ट होणार आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे निवडणूक आयोगाला पत्र

ग्रामपंचायत निवडणूकीसाठी सर्व्हर डाऊन असल्याने अर्ज अपलोड होत नाहीत तसेच अर्ज दाखल करण्यासाठी काही तासांचाच आवधी राहिलेला आहे. त्यामुळे या निवडणूकीसाठी ऑफलाईन पध्दतीने अर्ज स्विकारावेत तसेच मुदत वाढ द्यावी, यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्य निवडणूक आयोगाला पत्रव्यवहार केला.

        हेही वाचलंत का ?
SCROLL FOR NEXT