सोलापूर : सोलापूर रेल्वेस्थानक हे मध्य रेल्वेतील महत्वाचे स्थानक आहे. प्रवाशांच्या व रेल्वेच्या सुरक्षेच्या दृष्टीने रेल्वे सुरक्षा दल विशेष सतर्कता बाळगून आहे. त्यामुळे रेल्वेत प्रवास करताना शोभेचा दारूगोळा, फटाके किंवा कोणतेही ज्वलनशील पदार्थ जवळ बाळगू नका. अन्यथा दिवाळीच्या सणात तुम्हाला कारवाईला सामोरे जावे लागण्याची अथवा कोठडीत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. सोलापूर रेल्वे स्थानकावर आरपीएफ पथकाडून डॉग स्कॉडकडून कसून तपासणी करण्यात येत आहे.
रेल्वे कायद्यानुसार, रेल्वेतून प्रवास करताना कोणत्याही प्रकारचे ज्वलनशील पदार्थ अथवा स्फोटके, फटाके बाळगण्यास किंवा त्याची वाहतूक करण्यास सक्त मनाई आहे. असे असूनही अनेकजण लपूनछपून हे प्रतिबंधित पदार्थ, वस्तू सोबत नेतात. सध्या दिवाळीचा सण तोंडावर आहे. त्यामुळे गाड्या आणि रेल्वेस्थानकांवर गर्दी वाढली आहे. ती संधी साधून अनेकजण फटाक्यासारखे स्फोटक साहित्य, वस्तू सोबत नेत असल्याचे उघड झाले आहे. त्यासंबंधाने अनेक ठिकाणी कारवाई देखील झाली आहे.
रेल्वेत आग लागली किंवा स्फोट झाला तर अनेक प्रवाशांना धोका होण्याची भीती असते. त्यामुळे रेल्वे सुरक्षा दलाची विशेष पथके वेगवेगळ्या रेल्वेगाड्यांमध्ये तसेच रेल्वे स्थानकांच्या आत आणि बाहेर तैनात करण्यात आली आहेत. ही पथके कुण्या प्रवाशाजवळ फटाके आहेत का, कुणी दुसरे कोणतेही ज्वलनशील पदार्थ अथवा स्फोटके सोबत नेत आहेत का, त्याची कसून चौकशी करीत आहेत.
फटाके, स्फोटक साहित्य अथवा गॅस सिलिंडर, स्टोव्ह, केरोसिन, पेट्रोल, डिझेलसारखे ज्वलनशील पदार्थ रेल्वेस्थानकांवर नेऊ नये अथवा प्रवास करताना सोबत बाळगू नये, तसेच धूम्रपान करू नये, कुणाकडे असे साहित्य दिसून आल्यास तातडीने माहिती द्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
रेल्वे सुरक्षा दल प्रतिबंधित साहित्य सोबत नेताना कुणी आढळल्यास त्याच्यावर कडक कारवाई करीत आहेत. प्रवाशांनी त्याची दखल घेत कोणत्याही प्रकारचे ज्वलनशील पदार्थ घेवून प्रवास करुन नये अन्यथा अशा प्रवाशांवर कारवाई करण्यात येईल.
- योगेश पाटील,
वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, सोलापूर