Railway News | आता रेल्वेतून अधिक सामान नेल्यास होणार कारवाई!
मुंबई : रेल्वेच्या प्रवासी डब्यातील वर्दळीतील अडथळे टाळण्यासाठी आता नियमापेक्षा अधिक सामान नेणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. यापुढे स्कूटर, सायकल आणि अन्य सामानांससह मोठ्या आकाराच्या सामानांवर वजनात दिलेली दहा ते पंधरा टक्के सूटही ग्राह्य नसेल.
वांद्रे टर्मिनसमध्ये चेंगराचेंगरीची दुर्घटना घडल्यानंतर रेल्वे स्थानकातील गर्दी नियोजनासाठी पश्चिम रेल्वेकडून विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. हा त्याचाच एक भाग असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. सणासुदीच्या दिवसात मोठ्या बॅगांसह प्रवासी प्रवास करतात. यामुळे रेल्वेडब्यांमध्ये तसेच फलाटावर प्रवासी ये-जा करण्यास अडचणी निर्माण होतात. एक्स्प्रेसमध्ये प्रवास करताना ५ ते १२ वर्षांच्या प्रवाशाला तिच्या वजनाच्या निम्या वजनाच्या सामानासह प्रवास करण्याची मुभा आहे.
मालडब्यांच्या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन
अधिक वजनाचे सामान आढळल्यास त्यानुसार संबंधित प्रवाशांवर दंड आकारण्याच्या सूचना पश्चिम रेल्वेने संबंधितांना दिल्या आहेत. नियमापेक्षा जास्त वजनाचे व आकाराच्या सामानांसाठी मेल-एक्स्प्रेसच्या मालडब्यांची सुविधा आहे. प्रवाशांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पश्चिम रेल्वेने केले आहे.