सोलापूर : पुढारी वृत्तसेवा
सोलापूर शहर-जिल्ह्यामध्ये सोमवारी (दि. 23) सायंकाळी पाचच्या सुमारास पावसाने जोरदार बॅटिंग केली. तब्बल पाऊण तास मुसळधार पाऊस कोसळला. यामुळे सोलापूर शहरात सकल भागामध्ये पाणी साठले होते. अचानक झालेल्या या मुसळधार पावसामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला.
हवामान खात्याने सलग पाच ते सहा दिवस परतीच्या पावसाचा इशारा दिला आहे. सोलापुरात परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात होतो. सोमवारी सकाळी वातावरण स्वच्छ होते. मात्र, सायंकाळी चार नंतर वातावरणामध्ये अचानक बदल झाला. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ढगाळ वातावरण निर्माण होऊन जोरदार पावसाला सुरुवात झाली. जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याचे वृत्त आहे.
अचानक झालेल्या पावसामुळे वाहन चालक तसेच शालेय विद्यार्थ्यांना भिजतच घरी परतावे लागले. साठलेल्या पाण्यातून नागरिकांना वाट काढावी लागली. वाहन चालकांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागली. सायंकाळच्या सुमारास शाळा आणि कार्यालय सुटल्याने कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांना पावसात भिजत घरी परतावे लागले. काही जणांनी रेनकोट छत्र्यांचा असरा घेतला. शहरातील कामत चौक,
संगमेश्वर कॉलेज महाविद्यालय मार्ग, महावीर चौक, होटगी रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, निराळे वस्तीकडे जाणार्या रस्त्यांवर, नवी वेस पोलिस चौकी समोर, भैय्या चौक परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साठले होते.