बार्शी : बार्शी शहर व तालुक्यातील गणेश मूर्ती निर्मिती व रंगरंगोटीची कामे अंतिम टप्यात आली आहेत. भक्तगण सज्ज झाले आहेत.
तालुक्यातील पांगरी येथील कुंभार वाड्यात व बार्शी शहरातील लातुर रोड वरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समोरील भागात गणेशमुर्ती निर्मितीचे काम युध्दपातयीवर सुरु आहे. पांगरीत कुंभार वाड्यात मुर्तीकारांनी गत चार महिन्यापासून गणरायाच्या पारंपरिक पद्धतीने विविध रुपातील मूर्त्या तयार करण्यास सुरूवात केली होती. पांगरी येथे बालाजी दर्शन, लालबागचा राजा विठ्ठल दर्शन, दगडूशेठ हलवाई, पाचफणी गणपती,कमळातील गणराज, सिंहासनाधिन गणराज, ऊंदिरस्वार गणराज, अष्टविनायक, मंगलमुर्ती, कृष्णमूर्ती आदी विविध रूपातील गणेशमूर्ती तयार करण्यात येत आहेत.
गणेशोत्सव अगदी तोंडावर आला असल्यामुळे बार्शी शहरातील पुणे-लातूर राज्य मार्गावरील शासकीय विश्रामगृहासमोर परराज्यातील कलाकारांनीही आकर्षक व सुबक गणेशमुर्त्यांची निर्मिती केल्या आहेत.या कलाकारांची व गणेश मंडळांची मोठी लगबग सुरू असल्याचे दिसत आहे.
गणेश मूर्ती निर्मितीसाठी आवश्यक असणारा कच्चा माल प्लास्टर ऑफ पॅरिस, नारळाचा काथ्या, केसर, कागद, दोरा, आईल पेंट कलर, दुर्मिळ होत चाललेली शाडूची माती, प्लॅस्टिक पेंट कलर, वेलवेट, ब्रश, स्प्रे. पेटींग आदींच्या किमतीमध्ये यावर्षी भरिव वाढ झाली आहे. काळाची गरज ओळखून ईको फ्रेंन्डली गणेश मूर्त्यांची निर्मिती करणे गरजेचे आहे.
बार्शी शहरासह ग्रामिण भागात गणेश मंडळांची तयारी अंतिम टप्यात आली आहे. बार्शी शहराच्या विविध भागात जुनी परंपरा असलेल्या गणेश मंडळांनी मंडप, शेडच्या ऊभारण्या करून ठेवल्या आहेत. बार्शी शहरास गणेशोत्सवाचा मोठा वारसा आहे. त्यामुळेे देखाव्यांचा आनंद घेण्यासाठी ते उत्सुक असतात. 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव साजरा होणार आहे.