

बार्शी : प्रति पंढरपुर अशी ओळख असलेल्या बार्शी येथील भगवंत मंदिरात रविवारी हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.पुर्वापारपणे चालत आलेल्या धार्मिक परंपरेनुसार आषाढी एकादशीनिमित्त श्री भगवंत उत्सव मुर्तीची रथयात्रा मोठ्या उत्साहात झाली. ज्ञानोबा तुकाराम असा जयघोष करीत बार्शी शहरातील मुख्य मार्गावरुन रथयात्रा सुरू असतांना रस्त्याच्या दुतर्फा हजारो भाविक भक्तांनी भगवंत उत्सव मुर्तीचे दर्शन घेतले. भाविकांनी खारीक, खोबरे, विविध प्रकारची फुले इत्यादींची उधळण भगवंताच्या रथाच्या दिशेने केली.
भगवंत मंदिरात पहाटे 3 वाजता काकड आरतीचा नित्योपचार झाल्यानंतर अभिषेक करण्यात आले. सकाळी गरुडावर आरुढ झालेल्या श्री भगवंताच्या उत्सव मुर्तीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
बार्शी शहर व परिसरातील विविध गावासह शेजारील जिल्ह्यातील अणेक गावातील भक्त व भाविक भगवंत भेटीसाठी आपल्या गावातील दिंड्या घेऊन बार्शीला आले होते. त्यामुळेच बार्शीतील वातावरण भक्तिमय निर्माण झाले होते. भगवंत मंदिरात दर्शनासाठी विशेषतः महिलांची गर्दी लक्षणीय अशीच होती. पोलिस यंत्रणेबरोबरच अनेक स्वयंसेवक संघटनांनी योगदान देऊन दर्शन रांगेचे व्यवस्थापन केले. पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.
भगवंत दर्शनासाठी आलेल्या भाविकांना हेल्थ क्लब, राजाभाऊ राऊत मित्र मंडळ, अखंड मराठा समाज, तृतीय पंथी यांच्यासह विविध मित्र मंडळ व संस्थांच्या वतीने केळी, राजगिरा लाडू, चहा, दूध व फराळाचे वाटप करण्यात आले.