ग्रामीण रुग्णालय मोहोळ येथील इमारत Pudhari Photo
सोलापूर

सोलापूर : मृत्यूनंतरही मृतांचा शवविच्छेदनासाठी संघर्ष सुरू

पुढारी वृत्तसेवा

पोखरापूर : भारत नाईक

अनेक अडचणींचा सामना करत माणूस आयुष्याचा संघर्ष जिंकण्यासाठी प्रयत्न करतो. त्यातील काहीजण त्या संघर्षाची वाट अर्धवट सोडून मृत्यूपाशात अडकतात. म्हणतात ना मृत्यूनंतर सगळा संघर्ष संपतो, परंतु मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात मृत्यूनंतर शवविच्छेदनासाठी आलेल्या मृतांना संघर्ष करण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. दोन ते अडीच महिन्यांपासून शवविच्छेदन करणारा कर्मचारीच जागेवर नसल्यामुळे नातेवाईकांना आरोग्य विभागाच्या पाया पडून कर्मचारी उपलब्ध करावा लागत आहे. मृतांना सुद्धा ताटकळत ठेवण्याची किमया आरोग्य यंत्रणे कडून केली जात आहे.

आरोग्य यंत्रणा सक्षम झाली असल्याचे एकीकडे महाराष्ट्र शासन छातीठोकपणे सांगत असले तरी, दुसरीकडे मात्र माणसाला जिवंतपणी आरोग्याच्या सोयी सुविधा मिळवण्यासाठी संघर्ष करावा तर लागत आहेच, मात्र मोहोळ ग्रामीण रुग्णालयात माणसांना मेल्यानंतरही शवविच्छेदनासाठी संघर्ष करण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. 40 ते 45 हजार लोकसंख्येचे शहर व तालुक्याचे ठिकाण असलेल्या मोहोळ शहरांमध्ये ग्रामीण रुग्णालय आहे. तीन राष्ट्रीय महामार्ग असल्यामुळे अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे, तसेच आत्महत्यांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयाची आरोग्य यंत्रणा सक्षम करणे आवश्यक असताना मोहोळ ग्रामीण रुग्णालयातील शवविच्छेदन करणारा कर्मचारी गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून नागरिकांना उपलब्ध होत नाही.

त्यामुळे मोहोळ ग्रामीण रुग्णालयात मृत्यू झालेल्या एखाद्या व्यक्तीला किंवा महिलेला आणल्यानंतर नातेवाईकांना त्यांचे दुःख बाजूला ठेवून शवविच्छेदन करणारा कर्मचारी कुठे उपलब्ध होईल का? यासाठी ग्रामीण रुग्णालयातील कर्मचार्‍यांना हात जोडण्याची वेळ आली आहे. जरी कर्मचारी उपलब्ध झाला तरी नातेवाईकांची त्यातूनही आर्थिक पिळवणूक सुरू आहे. मृत्यूनंतरही माणसाला तासान् तास ताटकळत राहण्याची वेळ मोहोळ ग्रामीण रुग्णालयाच्या व जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या कारभारामुळे आली आहे. 1 ते 20 सप्टेंबरपर्यंत मोहोळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत अपघात व आत्महत्या अशा एकूण 7 जणांचा मृत्यू झाला आहे. मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात तात्काळ शवविच्छेदन करणार्‍या कर्मचार्‍यांची नेमणूक करण्याची मागणी नातेवाईकांमधून केली जात आहे.

एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर नातेवाईक अगोदरच दुःखात असतात. त्यानंतर मोहोळच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळे नातेवाईकांमध्ये आरोग्य विभागाच्या विरोधात तीव्र संताप होतो. मृत्यूनंतरही मृतांची फरपट सुरू आहे. या संदर्भात मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांना निवेदन पाठवून मोहोळच्या ग्रामीण रुग्णालयातील रिक्त कर्मचारी भरण्याची मागणी करणार आहे.
- सुरज जम्मा, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, जिल्हाप्रमुख सोलापूर
मोहोळच्या ग्रामीण रुग्णालयातील शवविच्छेदन कर्मचारी नसल्याबाबत सातत्याने तक्रारी येत आहेत. याबाबतची चौकशी करून त्या ठिकाणी काय उपाययोजना करता येतील, त्यासाठी प्रयत्न करू.
- डॉ. सुहास माने, जिल्हा शल्यचिकित्सक, सोलापूर
गेल्या दोन महिन्यांपासून तो कर्मचारी गैरहजर आहे. या संदर्भात वरिष्ठांना कळवितो आहोत. तसेच दुसर्‍या कर्मचार्‍याची ऑर्डर काढून त्याला प्रशिक्षणासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात पाठविणार आहे. 15 ते 20 दिवसात तो विषय मार्गी लावू.
- डॉ. रागिनी पवार, वैद्यकीय अधीक्षक, मोहोळ रुग्णालय

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT