Devendra Fadnavis Scam Pudhari
सोलापूर

Devendra Fadnavis: फडणवीसांच्या पहिल्या मुख्यमंत्री पदाच्या काळात 109 कोटींचा घोटाळा; न्यायालयाने दिले CBI चौकशीचे आदेश

Solapur Tree Plantation Scam: सोलापूरच्या सामाजिक वनीकरण विभागात वृक्ष लागवडीच्या नावाखाली 109 कोटी रुपयांचा कथित आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे.

पुढारी वृत्तसेवा

Solapur Tree Plantation Scam: सोलापूर जिल्ह्यातील सामाजिक वनीकरण विभागात वृक्ष लागवडीच्या नावाखाली तब्बल 109 कोटी रुपयांचा कथित आर्थिक घोटाळा झाल्याची माहिती समोर आली आहे. '33 कोटी वृक्ष लागवड' या महत्त्वाकांक्षी मोहिमेत प्रत्यक्षात झाडे न लावता केवळ कागदोपत्री लागवड दाखवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणाची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने हा तपास CBI कडे सोपवण्याचे निर्देश दिले आहेत.

काय आहे प्रकरण?

देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर '33 कोटी वृक्ष लागवड' अभियान राबवण्यात आले होते. या मोहिमेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात निधी खर्च झाल्याचे दाखवण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात अनेक ठिकाणी झाडे लावलीच नसून केवळ कागदावरच लागवड दाखवून निधीचा गैरवापर झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

याचिकेनंतर न्यायालयाचे आदेश

या कथित गैरव्यवहाराबाबत सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब चव्हाण यांनी तक्रार दाखल केली होती. पोलिसांकडेही याबाबत तक्रार करण्यात आली होती. मात्र, निष्पक्ष तपासासाठी हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात केली होती. या मागणीची दखल घेत न्यायालयाने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सीबीआयकडून करण्याचे आदेश दिले आहेत.

109 कोटींच्या खर्चावर प्रश्नचिन्ह

या प्रकरणात सुमारे 109 कोटी रुपयांचा निधी खर्च झाल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्षात वृक्ष लागवड झाली की नाही, निधीचा वापर कसा झाला आणि त्यात कोणाची जबाबदारी आहे, याचा सीबीआय तपास करणार आहे.

दोषींवर कारवाईची मागणी

याचिकाकर्त्यांनी या प्रकरणातील दोषी अधिकारी आणि संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच कथित गैरव्यवहारातून झालेली रक्कम वसूल करून ती पुन्हा वृक्ष लागवडीसाठी वापरण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

अधिवेशनात घोटाळा गाजण्याची शक्यता

राज्यात विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना हा कथित घोटाळा समोर आल्याने राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे. सीबीआयच्या चौकशीत नेमके काय निष्पन्न होते आणि या प्रकरणात कोणावर कारवाई होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT