Daylight Burglary at a Locked House in Modnimb: Cash and Jewelry Stolen
टेंभुर्णी : पुढारी वृत्तसेवा मोडनिंब (ता.माढा) येथे दिवसा ढवळ्या बंद घर फोडून धाडसी चोरी झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली असून लोकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. मोडनिंब शहरातील दत्तनगर भागात ही घटना घडली असून अज्ञात चोरट्याने २५ एप्रिल रोजी बंद घर फोडून कपाटातील ३६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व ३५ हजार रुपये रोख रक्कम असा एकून तीन लाख, पाच हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना शनिवारी दुपारी तीन ते रात्री ९.४५ वाजण्याच्या सुमारास दत्त नगर भागात घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी अनिता शिंदे या २५ एप्रिल रोजी दुपारी घरास कुलूप लावून बाहेर गेल्या होत्या. रात्री ९.४५ वाजण्याच्या सुमारास त्या घरी परतल्या असता त्यांना बंद घराच्या दरवाज्याचे कुलुप कोणीतरी तोडल्याचे दिसून आले. घरात जाऊन पाहिले असता घरातील कपटाचे लॉक ही तोडलेले दिसून आले.
अज्ञात चोरट्याने कपाटातील रोख रक्कम ३५ हजार शंभर रुपयाच्या ३५० नोटा, एक लाख ५० हजार रुपये किमतीचे दोन तोळ्याचे सोन्याचे गंठण, ३७ हजार ५०० रु.किमतीचे अर्धा तोळ्याचा नेकलेस, ३७ हजार ५०० रु.किमतीचे गळ्यातील सोन्याचे पेन्डल सहीत अर्धा तोळा वजनाची सोन्याची साखळी, १५ हजार रु.किमतीच्या दोन ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी तसेच ३० हजार रु.किमतीचे तीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील झुबे व टॉप्स तसेच एक ग्राम वजानाचे सोन्याचे मणी असा एकूण ३६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व ३५ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण तीन लाख पाच हजार रु.किमतीचा ऐवज चोरी झाला आहे.
गेल्या अनेक वर्षापासून टेंभुर्णी पोलीस ठाण्यांतर्गत भागात बंद घरे चोरट्याच्या टार्गेट आहेत. रोकड व दागिने असा कोट्यवधी रुपयांचा ऐवज चोरी झालेला आहे. मात्र चोरट्याचा बंदोबस्त करण्यात पोलीस खात्यास अद्याप ही यश येत नसल्याने नागरिकात नाराजीचा सूर आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस सब इन्स्पेक्टर प्रशांत मदने हे करीत आहेत.