Miraj House burglary : मिरजेत मध्यरात्री घरात घुसून 13 तोळे सोने, अर्धा किलो चांदीवर डल्ला

20 हजारांची रोकड लंपास : उघड्या दरवाजातून आत जात साधला डाव
House burglary
House burglary
Published on
Updated on

मिरज : मिरज शहरातील मंगळवार पेठ येथे मध्यरात्री उघड्या घराच्या दरवाजातून प्रवेश करून चोरट्याने तब्बल 13 तोळे सोने, 682 ग्रॅम चांदी आणि 20 हजारांच्या रोख रकमेवर डल्ला मारला. सोने, चांदी आणि रोकड अशा 9 लाख 64 हजार रुपयांच्या चोरीप्रकरणी प्रदीपसिंह बाबूसिंग रजपूत यांनी मिरज शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी प्रदीपसिंह रजपूत हे मंगळवार पेठ येथे वास्तव्यास आहेत. त्यांनी शहरातच नवीन घर बांधले आहे. ते त्या ठिकाणीच राहण्यासाठी जाणार होते. यासाठी त्यांनी जुन्या घरातील काही साहित्यही त्यांनी नवीन घरात नेले होते. शनिवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास रजपूत यांच्या घरातील सर्वजण नवीन घरात झोपण्यासाठी गेले होते. यादरम्यान चोरीस गेलेला मुद्देमाल मात्र जुन्याच घरात होता. नवीन घरात जाताना रजपूत हे त्यांच्या घराच्या टेरेसचा दरवाजा बंद करण्यास विसरले, त्यामुळे हा दरवाजा उघडाच होता.

दरम्यान, रजपूत यांच्या घरावर पाळत ठेऊन असलेल्या चोरट्याने टेरेसच्या उघड्या असलेल्या दरवाजातून आतमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांच्या घरातील कपाट फोडून सोन्याची माळ, पोहे हार, गंठण, मंगळसूत्र, चेन आणि अंगठी असे 9 लाख 10 हजार रुपयांचे 13 तोळे सोन्याचे दागिने, तसेच चांदीचे ताट, वाटी, पंचपात्र, करदोडे, ब्रेसलेट, तोडे-वाळे, मनगट्या, चांदीचे बिस्कीट, चांदीची नाणी, अशी 34 हजार रुपयांची 682 ग्रॅम वजनाची चांदी व 20 हजार रुपये रोख रक्कम, असा एकूण 9 लाख 64 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून पोबारा केला.

रजपूत हे रविवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घरी परतले. ते घराचा मुख्य दरवाजा उघडून आतमध्ये प्रवेश केला. त्यावेळी त्यांना कपाट फोडल्याचे निदर्शनास आले. याबाबतची माहिती त्यांनी तातडीने मिरज शहर पोलिसांना दिली. मिरज शहर पोलिस ठाण्याकडील निरीक्षक किरण चौगले, गुन्हे प्रकटीकरणचे सहायक निरीक्षक अण्णासाहेब गादेकर यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. चोरट्यांच्या मागावर पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.

माहितगार चोरट्याचे कृत्य?

रजपूत यांच्या घरात मोठ्या प्रमाणात सोने आणि चांदीचे दागिने असल्याची, तसेच ते घरी नसल्याची माहिती असलेल्या चोरट्यानेच ही चोरी केली असल्याची शक्यता आहे. तसेच रजपूत यांच्या घराची माहिती असणाऱ्या चोरट्याकडूनही हे कृत्य झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मिरज शहर पोलिस सर्व बाजू लक्षात घेऊन या चोरीचा तपास करीत आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news