Six thieves have been caught on CCTV camera.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये सहा चोर कैद झाले आहेत. Pudhari Photo
सोलापूर

पोखरापूर : मोहोळ शहरात घरफोडी; ६७ हजार रुपयांचे दागिने लंपास

पुढारी वृत्तसेवा

पोखरापूर, पुढारी वृत्तसेवा : मोहोळ शहरामध्ये एकाच दिवशी दोन घरफोड्या झाल्याची घटना उघडकीस आली. शहरातील यमाई नगर परिसरातील दोन बंद घराचे कुलपे तोडून अज्ञात चोरट्यांनी ६७ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने पळवले. हि घटना गुरुवारी (दि.18) पहाटे एक वाजण्याच्या दरम्यान घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहोळ पंढरपूर रस्त्यावरील यमाई नगर परिसरात संदीप नामदेव नरुटे (रा. आष्टे ता. मोहोळ) हे मुलांच्या शिक्षणासाठी भाड्याने घेतलेल्या खोलीत राहतात. शनिवारी (दि.13) ते मुलांच्या शाळेला सुट्टी असल्याने कुटुंबासमवेत घराला कुलूप लावून गावी गेले होते. त्यादरम्यान गुरुवारी (दि.18) पहाटे एक वाजण्याच्या दरम्यान त्यांच्या दरवाजाचा लावलेला कडी-कोंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करत घरातील सामान अस्ताव्यस्त केले होते. स्वयंपाक खोलीतील कट्ट्याच्या खाली स्टीलच्या डब्यामध्ये ठेवलेले सोन्याचे गंठण, चांदीचे दागिने असे एकूण ३७ हजार ५०० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेले. तसेच त्यांच्याच घराच्या पाठीमागे राहणाऱ्या सुमन दत्तात्रय जाधव यांच्याही बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत कपाट फोडून ३० हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरट्याने पळवून नेले. याबाबत संदीप नरुटे यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ओलेकर करीत आहेत.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये सहा चोरटे कैद

चोरी झालेल्या ठिकाणी तसेच दुसऱ्या एका ठिकाणी सीसीटीव्ही च्या कॅमेऱ्यामध्ये सहा चोरटे दिसत आहेत. अत्यंत सराईत पणे चोरट्यांनी बंद घर शोधली व त्या ठिकाणी चोऱ्या केल्याने मोहोळ शहरात एकच खळबळ उडाली आहे.

आषाढी वारीच्या बंदोबस्तासाठी मोठ्या संख्येने मोहोळ पोलीस ठाण्यातील कर्मचारी गेल्याने रात्रगस्तीसाठी पोलीस कर्मचारी कमी पडत आहेत, त्याचाच फायदा घेऊन चोरटे आपल्या भागात फिरत आहेत. पोलीस कर्मचारी उपलब्ध झाल्यानंतर तात्काळ रात्रगस्त सुरळीत होईल. व त्या माध्यमातून चोऱ्यांचे प्रमाण कमी होईल. तसेच सीसीटीव्ही च्या माध्यमातून चोरट्यांचा तपास सुरू आहे.
सुरेशकुमार राऊत, पोलीस निरीक्षक मोहोळ पोलीस ठाणे
SCROLL FOR NEXT