Judge House Robbery Barshi Solapur
सोलापूर: बार्शीत चक्क न्यायाधीशाच्याच घरात चोरट्यांनी हात साफ केल्याचा प्रकार समोर आला आहे. अज्ञात चोरट्यांनी तब्बल १५ तोळे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास केली. ही घटना बार्शी तालुक्यातील पाथरी गावात शुक्रवार मध्यरात्री झाली. आज (दि.१७) पहाटे ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी पद्मिनी मुकुंद गायकवाड यांनी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पद्मिनी गायकवाड यांचे पुत्र हे वाशिम जिल्ह्यात न्यायदंडधिकारी आहेत. धार्मिक कार्यक्रमा निमित्ताने ते त्यांच्या बार्शीतील पाथरी येथे मुळगावी आपल्या पत्नी आणि मुलासह आले होते. कार्यक्रम संपवून ते कोल्हापूरला देवदर्शनासाठी जाताना त्यांच्या पत्नी आणि मुलांचे दागिने त्यांनी पाथरी येथील घरीच ठेवले होते. शुक्रवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घरात शिरून बेडरूममध्ये ठेवलेले १५ तोळे सोने आणि रोख ५ हजार रुपये असे एकूण १२ लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
या प्रकरणी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या आई पद्मिनी मुकुंद गायकवाड यांनी बार्शी तालूका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.