

सोलापूर : मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेंतर्गत जिल्हा परिषदेतील 423 प्रशिक्षणार्थींना पुन्हा पाच महिन्यांची मुदतवाढ मिळाली आहे. त्या प्रशिक्षणार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या प्रशासन विभागाने नियुक्ती आदेश दिले आहेत.
मुख्यमंत्री कार्यकुशल योजनेंतर्गत जिल्हा परिषदेने 423 जणांना सहा महिने प्रशिक्षणावर घेतले होते. त्यांचा कालावधी संपल्यानंतर त्यांना आता पुन्हा पाच महिन्यांची मुदतवाढ सरकारने दिली आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या प्रशासन विभागाने मुख्यमंत्री कार्यकुशल प्रशिक्षण अंतर्गत प्रशिक्षणार्थ्यांना पुन्हा संधी द्यायची की नाही, याविषयी सहायक आयुक्तांकडे मार्गदर्शन मागविले होते. त्यांच्या मार्गदर्शनानुसार युवा प्रशिक्षणार्थ्यांना पुन्हा जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये हजर करुन घेतले आहे.
त्यामुळे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील युवकांना एकूण 11 महिन्यांच्या कालावधीसाठी प्रशिक्षण घेता येणार आहे. मात्र, यानंतर पुन्हा मुदतवाढ मिळणार नसल्याचे जीआरमध्ये नमूद आहे. त्यामुळे 11 महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर युवा प्रशिक्षणार्थ्यांवर पुन्हा बेरोजगारीचे संकट येणार आहे.