मोहोळ : कुणबी - मराठा आरक्षण आंदोलनाचे धडाडीचे नेते मनोज जरांगे - पाटील हे आरक्षणासाठी स्वतःच्या जीवाची बाजी लावत आहेत. आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईसाठी लेखी पुराव्याची आवश्यकता आहे. न्यायालयीन प्रक्रियेसाठी आणि शासनाच्या पुराव्यासाठी जनगणनेची आणि ब्रिटिश काळातील महत्त्वाचे पुरावे देण्यासाठी मोहोळ येथील डॉक्टर दांपत्य जरांगे -पाटलांना प्रत्यक्ष भेटले. तेव्हा त्यांनी काही महत्त्वाची कागदपत्रे त्यांना सुपूर्द केली. यावेळी सोलापुरातील सकल मराठा समाजाचे नेते माऊली पवार, मोहोळ येथील ॲड. श्रीरंग लाळे, पंडित ढवण, दाजी काकडे आदी उपस्थित होते. (Kunbi Maratha Evidence)
ब्रिटिश काळातील सोलापूर जिल्ह्यातील जातीनिहाय जनगणने बाबत मोहोळ तालुक्यात मराठा आरक्षणासाठी अग्रभागी असणारे अभ्यासू व्यक्तिमत्व डॉ.प्रमोद पाटील आणि त्यांच्या पत्नी डॉ. स्मिता पाटील यांनी अंतरावली सराटीत सोलापुरातील शिष्टमंडळासह जरांगे पाटलांची भेट घेतली. यावेळी जवळपास दोन ते अडीच तास विविध विषयांवर चर्चा होऊन पाटलांकडे महत्त्वाची कागदपत्रे देण्यात आली. (Kunbi Maratha Evidence)
भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशामध्ये विविध जाती,जमाती प्राचीन काळापासून पूर्वापार एकदिलाने नांदत आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ब्रिटिशांनी जातीनिहाय जनगणना करण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम काटेकोर नियोजन पूर्वक पार पाडले. त्याकाळी तंत्रज्ञान फारसे प्रगत नसतानाही अत्यंत चिकित्सापूर्वक सर्व जातींची जनगणना अचूक पद्धतीने केली. (Kunbi Maratha Evidence)
आज भारताच्या विविध राज्यांमध्ये आरक्षणाचा लढा तीव्र होत असताना ब्रिटीशकालीन जनगणनेची गरज तीव्र स्वरूपात जाणवत आहे. तत्कालीन ब्रिटिश जनगणनेची अचूक आकडेवारी प्रसिद्ध इतिहासतज्ज्ञ, अभ्यासक, कादंबरीकार विश्वास पाटील यांनी खूप परिश्रमाने गोळा केली आहे. आरक्षणासारख्या गंभीर समस्येमध्ये सरकारला या आकडेवारीची मोलाची मदत होणार आहे. ही माहिती सरकारला आरक्षण प्रश्नाची कोंडी फोडण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. (Kunbi Maratha Evidence)
17 फेब्रुवारी 1881 या दिवशी ब्रिटिशांनी केलेल्या जनगणनेनुसार अक्कलकोट संस्थान सोडून तेव्हाच्या सोलापूर जिल्ह्याची एकूण लोकसंख्या 5 लाख 82 हजार 487 इतकी होती. त्यापैकी 2 लाख 87 हजार 678 स्त्रिया व पुरुषांची संख्या 2 लाख 94 हजार 814 होती. औरंगजेबाने विजापूरवर आक्रमण केल्यानंतर शेवटी औरंगजेब व विजापूरचा आदिलशहा यांच्यामध्ये 1686- 87 च्या करारानुसार सोलापूरचा मुलुख मोगलांच्या ताब्यात दिला गेला. 1817 व 1818 मध्ये झालेल्या पंढरपूर आणि अष्ट्याच्या लढाईनंतर सोलापूरचा तह झाला. त्यानंतर ब्रिटिशांनी खऱ्या अर्थाने सोलापूर प्रदेशात पाय पसरले. (Kunbi Maratha Evidence)
1838 मध्ये सोलापूरला कलेक्टर ऑफिस सुरू होऊन तिथे खऱ्या अर्थाने आधुनिक प्रशासन सुरू झाले. सोलापूरचा कलेक्टर हा तेव्हा शेजारच्या अक्कलकोट संस्थानाचा पॉलिटिकल एजंट म्हणून ब्रिटिश सरकार मार्फत काम पाहत असे.
जिल्ह्याची पहिली जनगणना ब्रिटिश काळातच 1872 ला झाली. तर 1901 च्या जनगणनेनंतर जिल्ह्याची विभागणी सात तालुक्यांमध्ये झाली ब्रिटिशांनी आपल्या जनगणनेचे शिवधनुष्य पेलण्यासाठी भारतभर कसोशीने प्रयत्न केले आहेत. या सर्व जनगणना प्रचंड तयारीने, शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेले आहेत. त्यासाठी भारतभर प्रशिक्षकांची फौज तयार करून त्यांना दीड वर्ष ट्रेनिंग देण्यात आले होते. या कामासाठी झालेल्या सर्व खर्चाच्या नोंदी सुद्धा कागदपत्रात आजहीआढळून येतात. 1901 च्या जनगणनेनुसार सोलापूर जिल्ह्याची तेव्हाची लोकसंख्या 7 लाख, 20 हजार 977 होती.
ब्राह्मण 27,059 धनगर 57, 704 कुणबी- मराठा एक लाख 78 हजार 908 राजपूत 9032, बेरड 3404, भंडारी 23, चांभार 13,523 शिंपी 6,223, धोबी 4,085 न्हावी 5,959 जंगम 3,838 कोळी मराठा 7,530 कोष्टी 10,658, कुंभार 3,852 लिंगायत21,509 लोहार 2,938 माळी 23,808 मांग 19,888 महार 44, 001 सोनार 5,807,सुतार 4,824 ,तेली 6,759, वंजारी 3,397 पठाण4,360, शेख 35,177
हिंदू 5 लाख 30 हजार 121, मुस्लिम 43 हजार 997, ख्रिश्चन 625, जैन 7,519, पारशी 157, शीख 08
वडार 4,082, ढोर 2,058, रामोशी 2,863, गुरव 3,596, भाट 88, बेलदार 120, बुरुड 343, गवंडी 817, कासार 1212, खत्री 1125, पाथरवट 410, साळी 8,950, लमान 130, बैरागी 904, साधू 365, रंगारी 891, होलार 1857, गोंधळी 631, गवळी 1781, खाटीक 686, गोसावी 631, कैकाडी 1510, वाणी 10,231, भुई 1550, बोहरा 65, कनोजी 280, भंगी 28, ओसवाल 846, धनगर 1357.
सोलापूर जिल्ह्यात मराठा प्रवर्गामध्ये जनगणना फॉर्म मध्ये सर्वच मराठ्यांची नोंद आडव्या पत्रकात कॉलम 13 मध्ये कुणबी-मराठा अशीच नोंदली केली गेली आहे. सोलापूरच्या शेजारी निजाम राजवटीतला नळदुर्ग हा जिल्हा होता. सुरुवातीला 60 ते 70 वर्ष उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव नळदुर्ग जिल्हा असेच होते. सोलापूर तेव्हा मुंबई प्रांतात म्हणजे बॉम्बे प्रेसिडेन्सी मध्ये येत असे. या जिल्ह्याच्या जवळ याच मुंबई प्रांतातला बेळगाव जिल्हा होता. तिथे मात्र ब्रिटिशांनी आपल्या गॅझेट मध्ये मराठ्यांची संख्या 1, 19, 300 व कुणब्यांची वेगळी संख्या 42 हजार 650 दिली आहे.
1884 मध्ये प्रकाशित झालेल्या बेळगावच्या डिस्ट्रिक्ट गॅजेटमध्ये पान क्रमांक 126 वर कुणब्यांची सुंदर व्याख्या ब्रिटिशांनी ‘Cultivating Marathas are called Kunbij, Kulvadis’ ('शेती करणाऱ्या मराठ्यांना कुणबीज,कुळवाडी म्हणतात') अशी केली आहे. मात्र, सातारा, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातील प्रत्यक्ष जनगणनेच्या आडव्या पत्रकात कॉलम 13 मध्ये कुणबी- मराठा अशाच नोंदी स्पष्टपणे करण्यात आल्या आहेत. त्याची कारणे ही ब्रिटिशांनी आपल्या गॅझेटमध्ये दहा ते पंधरा पाने लिहून स्पष्ट केली आहेत.
विश्वास पाटील यांनी दिलेल्या या आकडेवारीनुसार ब्रिटिशांनी महाराष्ट्रातील सातारा, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातील प्रत्यक्ष जनगणनेच्या आडव्या पत्रकात कॉलम 13 मध्ये कुणबी-मराठा अशा स्पष्ट पणे नोंदी कारणासह केल्या आहेत. यावरून महाराष्ट्रातील मराठा आणि कुणबी एकच आहेत. हे सूर्यप्रकाशा इतके स्वच्छ आहे. सरकारने या गोष्टीचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. मराठा आरक्षणासाठी शेकडो तरुण मुले अतिव निराशे पोटी जीवन संपवत आहेत.
अनेक ओबीसी जाती व्यापार उदिमामुळे आर्थिक दृष्ट्या समृद्ध असून ही आरक्षणाचा लाभ घेत आहेत. तर अनेक ओबीसी मधील आर्थिक दृष्ट्या दुरावस्थेत असणाऱ्या जाती आरक्षणापासून वंचित आहेत. जाती गणना केल्यास प्रत्येक जातीची आर्थिक स्थिती, सामाजिक स्थिती, लोकसंख्या समोर येईल आणि आरक्षणापासून वंचित असणाऱ्या ओबीसी मधील जातीनाही आरक्षणाचा लाभ होईल. तसेच केवळ शेतीवर अवलंबून असणाऱ्या आर्थिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, शैक्षणिक दृष्ट्या दुर्बल मराठा बांधवांनाही आरक्षण देण्याचा मार्ग सुकर होईल. त्यामुळे विश्वास पाटलांनी गोळा केलेल्या या आकडेवारीचा अभ्यास करून जातीनिहाय जनगणना करण्यात यावी. राज्यात मराठा आणि कुणबी वेगळ्या जाती नसून एकच आहेत हे जळजळीत सत्य समोर येऊन ही मराठा आरक्षणाचा गांभीर्याने विचार न करणे म्हणजे पिचलेल्या मराठा समाजावर अन्याय करण्यासारखे आहे.
विश्वास पाटील यांचा प्रशासकीय कार्याचा प्रदीर्घ अनुभव लक्षात घेऊन त्यांनी अभ्यास पूर्वक सादर केलेल्या प्रत्येक जिल्ह्यातील जातीनिहाय जनगणनेच्या आकडेवारीचा उपयोग करून सर्व जातींना न्याय देण्याचा प्रयत्न महाराष्ट्र शासनाने करावा. ही राज्य सरकारला मराठा कुणबी समाजाचे प्रतिनिधी म्हणून नम्र विनंती आहे.- डॉ. प्रमोद व स्मिता पाटील, मोहोळ, जि.सोलापूर