सोलापूर : गेल्या चार दिवसांपासून पुणे, परिसर आणि वीर धरण माथ्यावर पाऊस कोसळत असल्याने नीरा आणि भीमा नदीला पूर आला आहे. भीमा, नीरा संगमाजळ भीमा नदीचा प्रवाह गुरुवारी (दि.21) सायंकाळी पाच वाजता एक लाख 96 हजार 495 क्युसेकने आहे. त्यामुळे त्याचा फटका पंढरपूरसह अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, मंगळवेढा तालुक्याला बसणार आहे. या भागात पूर येणार आहे.
गुरुवारी सायंकाळी उजनी आणि वीरमधून एक लाख 66 हजार 824 क्युसेकचा विसर्ग सुरू होता. भीमा खोर्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणात येणारी पाण्याची आवक वाढल्याने उजनी धरणातून गुरुवारी पहाटे भीमा नदीत एक लाख 30 हजार क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला. त्यात पुन्हा वाढ करून सकाळी 10 वाजता एक लाख 40 हजार क्युसेकचा विसर्ग करण्यात आला. सायंकाळी पाच वाजता विसर्गात आणखी वाढ करत एक लाख 51 हजार 600 क्युसेक इतका करण्यात आला.
वीर धरणातून गुरुवारी सकाळपासूनच पाण्याचा विसर्ग कमी करून 15 हजार 324 क्युसेक करण्यात आला. सुरुवातीला वीर धरणातून 54 हजार क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला होता. त्यात कमी करण्यात आल्याने काही अंशी दिलासा मिळाला आहे.भीमा नदीला पूर आल्याने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात येत आहेत. अक्कलकोट तालुक्यातील आळगे-हिंगणी बंधारा पाण्याखाली जाऊन त्याच्या बॅकवॉटरने सीना नदीवरील कलकर्जाळ बंधारा बुडला. बॅक वॉटर बंदलगी बंधार्यापर्यंत पसरले आहे.
अनेक शेतकर्यांनी ऊस पिकांना पर्याय म्हणून भीमा नदीकाठी उडीद, तूर, सोयाबीन, कापूस, कांदा यासारख्या पिकांना प्राधान्य दिले आहे. उजनी आणि वीरसह सीना नदी, अन्य नद्या, नाले-ओढ्यांतून येणार्या पाण्यामुळे हा विसर्ग दोन लाखांपर्यंत पोहोचल्याने उडीद पिकात पाणी घुसून नुकसान होण्याची भीती आहे.
काढणीला आलेली उडीद, सोयाबीन आणि इतर नगदी पिके पाण्याखाली जाण्याची भीती असून, मोठ्या आर्थिक नुकसानीची शक्यता आहे. नदीकाठच्या लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्याचे काम सुरू असून, प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा जारी.
उजनी धरणातून तब्बल 1 लाख 51 हजार 600 क्युसेक पाण्याचा विसर्ग
नीरा-नृसिंह संगमाजवळ भीमा नदीचा प्रवाह जवळपास 2 लाख क्युसेक
पंढरपूरसह अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, मंगळवेढा तालुक्यांतील नदीकाठच्या गावांना धोका