

सोलापूर : सोलापूर ते धाराशिव रेल्वे भूसंपादन निधी वाटपबाबत झालेल्या चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाला असून यात सुमारे 141 कोटी रुपयांचा अतिरिक्त मोबदला वाटप करण्यात आला आहे. याबाबत चौकशी समितीकडून प्राप्त झालेला अहवाल राज्य शासनाच्या प्रधान सचिव यांच्याकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती सोमवारी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
सोलापूर - धाराशिव रेल्वे भूसंपादनाच्या विषयात अनेक शेतकर्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होता. त्यानंतर अप्परजिल्हाधिकारी यांच्यामार्फत या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्यात आली. या समितीकडून अहवाल नुकताच सादर करण्यात आला.यात 141 कोटी रुपयांचा वाढीव मोबदला देण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले असल्याचेही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले. शेतकर्यांना देण्यात आलेला अतिरिक्त मोबदला वसूल करण्याची नियमात तरतूद नाही. याप्रकरणी तत्कालीन भूसंपादन उपजिल्हाधिकारी मात्र चांगलेच अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
भूसंपादन नियमानुसार शेतकर्यांना मोबदला वाटप केल्यानंतर ती रक्कम परत घेण्याची तरतूद नाही. शेतकर्यांना जमिनीच्या भूसंपादनापोटी दिलेली अतिरिक्त 141 कोटी रुपये आढळून आली आहे. शेतातील झाडे, विहीर व अन्य मालमत्तेच्या भूसंपादनाच्या मोबदल्याचा या चौकशीत समावेश नसल्याचेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.