सोलापूर : सोलापुरातील बेडर पूल येथील गॅस गळती प्रकरणात चौथा बळी गेला आहे. रंजनाबाई युवराज बलरामवाले यांचा मंगळवारी (दि. 2) सकाळी मृत्यू झाला. घटनेच्या दिवशी दोन लहान मुलांचा रात्री उशिरा मृत्यू झाला, तर साठ वर्षीय आजीचा सोमवारी (दि. 1) दुपारी मृत्यू झाला होता.
बेडर पूल येथील रहिवासी युवराज मोहनसिंग बलरामवाले (वय 40), रंजनाबाई युवराज बलरामवाले (वय 35), हर्ष बलरामवाले (वय 6), अक्षरा बलरामवाले (वय 4) आणि विमल मोहनसिंग बलरामवाले (वय 60) हे घरात बेशुद्ध अवस्थेत आढळून आले होते.
गॅस गळतीमुळे पाचही जण अत्यव्यस्थ झाले होते. यातील रंजनाबाई बलरामवाले यांचा उपचार सुरू असताना मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. त्यापूर्वी हर्ष आणि अक्षरा या दोन चिमुरड्यांचा तसेच आजी विमल यांचा मृत्यू झाला आहे. युवराज बलरामवाले यांच्यावर उपचार सुरू आहेत.
गॅस गळतीमुळे हा प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात दिसते. बराच वेळ झाला तरी कोणी घराबाहेर येत नसल्याचे पाहून नातेवाइकांनी पत्रा उचकटून आत प्रवेश केला आणि त्यांना सर्वजण बेशुद्ध असल्याचे आढळून आले.