बार्शी : शेअर बाजारात विविध कंपन्यांमध्ये पैसे गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करून एका महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी बार्शी शहर पोलिस ठाण्यात शहरातील एकाच कुटुंबातील चौघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. सुनील नवनाथ वायचळ, गणेश नवनाथ वायचळ, सुयोग गणेश वायचळ, सौरभ गणेश वायचळ (रा. वाणी प्लॉट, कॅन्सर हॉस्पिटलजवळ, बार्शी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
रुक्साना ईमरान डिग्रजे (वय 36, रा. वाणी प्लॉट, बार्शी) या महिलेने याबाबत शहर पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, सुनील वायचळ यांनी घरी बोलवले. त्यामुळे मी भावाला घेऊन त्यांच्या घरी गेले. वायचळ घराण्यातील लोकांनी गुंतवणुकीविषयी बोलण्यास सुरुवात केली. त्यांनी सांगितले की, या कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला 10 टक्के परतावा मिळतो.
त्यावेळी गणेश वायचळ आणि त्यांची दोन्ही मुले सौरभ व सुयोग यांनी त्यांच्या लॅपटॉपमधील सर्व डाटा दाखवित त्यांनी आतापर्यंत किती जणांना फायदा करून दिला, किती मोठ्या प्रमाणात परतावा दिला हे सांगितले. त्यावर मी त्यांना विचारले की, जर कंपनी बुडाली तर मी गुंतविलेले पैसे मला परत कोण देणार? त्यावेळी सुनील वायचळ म्हणाले, माझ्या शब्दावर विश्वास ठेव. कंपनी कधीही बुडाली तरी तुझ्या पैशची जबाबदारी मी स्वीकारतो. मी तुझे सर्व पैसे परत देतो. तू फक्त पैशाची लगेच तयारी कर. त्यामुळे सुनील व इतर सर्वांवर विश्वास ठेवून त्यांनी भगवंत सहकारी बँकेतून पाच लाख रूपये कर्ज काढले. त्यातील 4 लाख 80 हजारांची रक्कम माझ्या खात्यावरून वायचळ यांनी वळती केली.
वायचळ यांनी रक्कम घेतली परंतु त्यांनी माझे डीमॅट खाते काढले नाही. त्यांना याविषयी विचारणा केली असता, ते म्हणायचे तुझ्या पैशाची मी जबाबदारी घेत आहे. तू काळजी करू नको. काही दिवसांत वेळोवेळी थोडी, थोडी रक्कम मिळून त्यांना साधारण दीड लाख रूपये भेटले. त्यांनतर काहीच रक्कम मला दिली नाही. त्याबाबत सुनील वायचळ यांना व इतरांना प्रत्यक्ष भेटून किंवा फोन वरून विचारणा करत असे. त्यावेळी त्यांनी मला तुझ्या खात्यावर पैसे जमा होतील नाहीतर आम्ही स्वतः तुला तुझे पैसे देऊ असे म्हणत होते. सात ते आठ महिन्यांपासून सतत पैसे मागत होते. परंतु त्यांनी टाळायचा प्रयत्न केला. काही दिवसांनी तर सुनील यांनी मला यापुढे मला पैसे मागू नकोस. मी तुझे पैसे देणार नाही. तू जर पोलिसांकडे गेली तरी तुला पैसे मिळणार नाहीत, असे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक बालाजी कुकडे करत आहेत.
बार्शी येथे शेअर मार्केटच्या नावावर कोट्यावधी रुपयाची फसवणूक झाल्याबाबत काही दिवसापूर्वी दैनिक पुढारीने सलग सहा भागांमध्ये याबाबत वृत्तमालिका प्रसिद्ध करून लोकांना सावध केले होते. अखेर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाल्यामुळे या प्रकरणाला पुष्टी मिळाले आहे. पुढार्रीीीं दिलेले वृत्त अखेर खरे ठरले. या प्रकरणामध्ये आणखी तक्रारदार लवकरच पुढे येणार असल्याची चर्चा आहे.