नातेपुते : पुढारी वृत्तसेवा; सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी (ता. माळशिरस) गाव चर्चेत आले आहे. मारकडवाडी गावकर्यांनी ईव्हीएमवर आक्षेप घेत मंगळवारी (दि. ३) बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी केली. एवढेच नाही तर गावकऱ्यांनी बूथ उभारून मंगळवारी मतदानाची प्रक्रिया राबवण्याचीही तयारी केली. दरम्यान, येथील मतदान प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आली. येत्या आठ दिवसांत २५ ते ५० हजार नागरिकांसमवेत माळशिरस तहसीलवर मोर्चा काढणार असल्याचे आमदार उत्तम जानकर यांनी म्हटले आहे.
प्रशासनाने मतदानोत्तर चाचणी फेटाळून लावली आहे. गावात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून जमावबंदीही लागू करण्यात आली. तेथे मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
उत्तम जानकर यांच्यामध्ये जी चर्चा झाली; त्यात पोलिसांनी सांगितले होते की, एक जरी मत पोल झाले तर आपण कारवाई करू. हे साहित्य जप्त करत असताना काही बळाचा वापर झाला तर याची सर्वस्वी जबाबदारी ही त्यांच्यावरती असेल. तसेच कायदेशीर कारवाई करून या प्रक्रियेमध्ये सहभागी असणाऱ्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येतील. त्यानंतर उत्तम जानकार यांनी त्यांच्या समर्थकांशी चर्चा करून ही प्रक्रिया रद्द करत असल्याचे जाहीर केले. पण यापुढे न्यायालयीन प्रक्रियेमधून आपण न्याय मागू, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, निवडणूक आयोगाशिवाय इतर कोणतीही यंत्रणा अशा पद्धतीने मतदान प्रक्रिया घेऊ शकत नाही, असे निवडणूक निर्णय अधिकारी विजया पागरकर यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे मंगळवारी मतदानाची प्रक्रिया राबल्यास त्या नागरिकांवर कारवाई करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला. येथे भारतीय न्याय संहितेचे कलम १६३ नुसार येथे जमावबंदी लागू करण्यात आली. आदेशाचा भंग करून मतदान प्रक्रिया राबविली तर सहभागी होणार्या ग्रामस्थांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येणार आहे.