

नातेपुते : मारकडवाडी (ता. माळशिरस) गावात (Markadwadi Voting) सोमवारपासून (दि. 2) पाच डिसेंबरपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. गावात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने जमावबंदी लागू केली आहे.
मारकडवाडी गावकर्यांनी ईव्हीएमवर आक्षेप घेत मंगळवारी (दि. 3) बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी केली आहे. मात्र, प्रशासनाने मतदानोत्तर चाचणी फेटाळून लावली आहे. तरीही येथे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाशिवाय इतर कोणतीही यंत्रणा अशा पद्धतीने मतदान घेऊ शकत नाही, असे निवडणूक निर्णय अधिकारी विजया पागरकर यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे मंगळवारी मतदानाची प्रक्रिया राबल्यास त्या नागरिकांवर कारवाई करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेचे कलम 163 प्रमाणे ही जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
आदेशाचा भंग करून मतदान प्रक्रिया राबविली तर सहभागी होणार्या ग्रामस्थांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येणार आहे.