टेंभुर्णी: पुढारी वृत्तसेवा : माढा तालुक्यातील खैराव-मानेगाव उपसा सिंचन योजनेच्या प्रकल्प अहवालास प्रशासकीय मान्यता देण्यात यावी, यासाठी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे मागणी केल्याची माहिती माजी आमदार बबनराव शिंदे यांनी दिली.
शिंदे म्हणाले की, माढा तालुक्यातील पूर्व भागातील मानेगांव, धानोरे, बुद्रुकवाडी, कापसेवाडी, हटकरवाडी, पाचफुलवाडी ही गावे अनेक वर्षांपासून पाण्यापासून वंचित आहेत. तसेच ही गावे कायम दुष्काळी पट्ट्यातील आहेत. या गावांना कोणतीही सिंचन व्यवस्था नाही. या गावांना बंद पाईपलाईन प्रणालीव्दारे (PDN) पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी खैराव येथील सिना नदीच्या बंधाऱ्यातून खैराव-मानेगाव उपसा सिंचन योजना देण्यासाठी शासनाने मंजुरी दिलेली आहे. खैराव-मानेगाव उपसा सिंचन योजनाचा पूर्व व्यवहार्यता अहवालास (PFR) मंजुरी मिळालेली असून तत्कालीन राज्य शासनाने या योजनेचा प्रकल्प अहवाल सादर करण्याच्या सुचना दिलेल्या उ प्रकल्प अहवालास प्रशासकीय मान्यता मिळावी. म्हणून जलसंपदामंत्री विखे पाटील यांची भेट घेऊन मागणी करण्यात आली.
तसेच सीना माढा उपसा सिंचन योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांचे भूसंपादन झालेले आहे अशा कन्हेरगांव, दहिवली, निमगांव (टें), तांबवे (टें), सापटणे (टें), कुर्डू, लऊळ, अरण, भेंड, वरवडे, भुताष्टे यासह योजनेतील इतर गावांच्या संपादित केलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीच्या भूसंपादनाचा मोबदला अनेक वर्षांपासून मिळाला नसल्याने शासनाकडे निधी मंजूर करावा, अशी मागणी केली असता शासनाने ३५ कोटींच्या प्रस्तावास मंजुरी दिलेली आहे.
यापैकी २१ कोटी रुपये निधीची मागणी कृष्णा खोरे विकास महामंडळाने शासनाकडे केलेली आहे. सीना-माढा उपसा सिंचन योजनेतील शेतकऱ्यांना भूसंपादनाची रक्कम लवकरात लवकर वितरीत करावी. व मेंढापूर कट योजना कार्यान्वित करुन मेंढापूर, खरातवाडी, बाभूळगाव, आढीव, रोपळे परिसरात उपसा सिंचन योजना राबवावी, अशी मागणी जलसंपदामंत्री विखे पाटील यांच्याकडे करण्यात आली. या मागण्याची शासनाकडून दखल घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन विखे पाटील यांनी दिले असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
सीना-माढा उपसा सिंचन योजनेमध्ये माढा तालुक्यातील बावी, तुळशी, परितेवाडी, कुर्डू, पिंपळखुंटे, अंबाड, अंजनगांव (खे) या गावांचा सामावेश करण्याबाबत शासनाकडून मान्यता मिळाली आहे. या योजनेचा तृतीय सुप्रमा तयार करुन गावातील विकेंद्रीत जलसाठे भरुन घेण्यासाठी तृतीय सुप्रमा मंजूर करुन निधीची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी शिंदे यांनी केली.
मागील आठवड्यात विखे पाटील यांच्याकडे कालवा सल्लागार समितीची बैठक घेऊन निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी केली होती. त्यानुसार बैठकीत शनिवारपासून सीना नदी, डावा-उजवा कालवा, सीना माढा उपसा सिंचन योजनेमधून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा शिंदे यांनी सांगितले.