

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा
गत काही दिवसांपासून रेल्वे रुळावर दगड ठेवणे, गॅस टाकी ठेवणे, स्लिपर ठेऊन रेल्वेचा अपघात घडविण्याच्या घटना ताज्या असतानाच आता गाडी (क्रमांक २२२२५) मुंबई-सोलापूर मार्गावर धावणार्या’ वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेसवर गुरुवारी (दि.२) रोजी रात्री ९. २० वाजता जेऊर-कुर्डूवाडी सेक्शनमधील भाळवणी स्थानकाजवळ अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली.
यात कोच क्रमांक सी-11 मधील सीट क्रमांक 2 आणि 3 च्या खिडकीच्या काचा फुटल्या. या घटनेत प्रवाशांना कोणतीही इजा झाली नाही. दगडफेकीची घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. यामुळे आता रेल्वे सुरक्षा बल सतर्क झाले असून, यावर कोणता ठोस निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान, मध्य रेल्वेवर सीएसएमटी- शिर्डी आणि सीएसएमटी-सोलापूर या वंदे भारत एक्स्प्रेस १० फेब्रुवारी २०२३ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सुरु करण्यात आली. या दोन्ही एक्सप्रेसला प्रवाशांच्या तुफान प्रतिसाद मिळत आहे.
मात्र, मुंबई-सोलापूर सेमी हायस्पीड वंदे भारत ट्रेनवर दगडफेकीची घटना घडली आहे. गुरुवारी (दि. २) रोजी रात्री सोलापूरच्या वंदे भारत ट्रेन जेऊर स्थानकातून पुढे निघताच दगडफेकीची घटना घडली. यामध्ये गाडीची काच फुटली आहे. मात्र सुदैवाने प्रवाशांना कोणतीही इजा झाली नसल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे.
या प्रकरणी दगडफेक करणार्यांचा रेल्वे पोलीसांकडून शोध घेतला जात आहे. याआधीही याच परिसरात वंदे भारत ट्रेनवर दगडफेक झाली होती. या दगडफेकीच्या घटनेला आळा घालण्यासाठी सोलापूर विभागाच्या रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) रेल्वे रुळालगत गस्त वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.