सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी 30 क्विंटल केळींची आवक झाली आहे. ऐन नवरात्र उत्सवात केळीची आवक घटल्याने आणि मागणी वाढल्याने केळीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला त्याचा आर्थिक भार सोसावा लागत आहे. नवरात्र उत्सवात अनेक भाविक उपवास धरत असतात. त्यामुळे याकाळात केळीला मोठी मागणी असते. त्यातच केळीच्या दरात 20 ते 30 रुपयांनी वाढ झाल्याने भाविकांना त्याचा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. बाजार समितीमध्ये 30 क्विंटल केळीची आवक झाली असून प्रति टनाला 1500 ते 1700 रुपयांचा भाव मिळत आहेत. गेल्या आठवड्यात बाजार समितीमध्ये 40 क्विंटल केळीची आवक झाली होती. त्यास 1200 ते 1500 रुपयांचा भाव मिळाला होता. मात्र, ऐन नवरात्र महोत्सवाच्या वेळी केळीची आवक कमी झाल्याने भावात वाढ करण्यात आली आहे.
ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते
पिकलेली केळी हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी मदत करतात. यातील पोटॅशियम हार्ट हेल्थ चांगले ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतात. नियमित केळी खाल्ल्याने ब्लडप्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत होते.
येथून होतेय आवक
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट आणि मोहोळ तालुक्यातून केळीची आवक होत असल्याचे सोलापूर बाजार समितीने सांगितले आहे.
कार्बाईडचा वापर
सध्या रासायनिक प्रक्रियेद्वारे कमी कालावधीत कच्ची केळी ही पिवळी केली जात आहेत. कार्बाईड प्रक्रिया करून केळी विक्रीसाठी बाजारात आणली जात आहे. अशा केळीमुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजारांना समोरे जावे लागत आहे. त्यामुळे नैसर्गिक पद्धतीने पिकवलेली केळी खरेदी करावीत.
कोणती केळी खावीत
केळी हे असे फळ आहे की ज्यामुळे फक्त शरीराला पोषण मिळत नाही, तर आरोग्यदेखील चांगले राहाते. त्यामुळे केळी खावीत. मात्र कोणती केळी खावीत, असा प्रश्न नागरिकांना पडतो. घरात ठेवलेल्या केळ्यांवर काळे डाग आलेले केळी खावीत. त्यामुळे शरीराला कोणतेही नुकसान होत नाही, असे डॉक्टर सांगतात.
थकवा होतो कमी
केळ्यातील फायबर्समुळे पोट जास्त वेळ भरलेले राहाते. त्यामुळे भूक कमी लागते. केळ्यात नॅच्युरल साखरेचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे शरीराला एनर्जी मिळते. त्यामुळे थकवा कमी होण्यास मदत होते.
घरीच पिकवून खा केळी
बाजारात नैसर्गिक आणि केमिकल टाकून पिकवलेली केळी ओळखणे फार अवघड झाले आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या तसेच केमिकलने पिकविलेल्या केळीमुळे हळूहळू माणसाला आजारी पाडते. अशी केळी खाण्यापेक्षा गवतामध्ये ठेऊन नैसर्गिक पद्धतीने केळी पिकवून खावीत.
केळीमधील जीवनसत्त्वे
केळी जास्त पौष्टिक आहे. व्हिटामिन, मिनरल्स आणि अँटिऑक्सिडेंटस्चे प्रमाण जास्त असते. शरीराला भरपूर पोषण मिळते. डाग लागलेल्या केळीमध्ये व्हिटामिन सी, पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटामिन बी-6 असते. पोषणतत्त्व आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात.