खिशाला परवडणारे, पौष्टिक अन् वर्षभर मिळणारे फळ म्हटले की लगेच केळी डोळ्यांसमोर उभी राहतात. प्रत्येकाच्या आवाक्यात असणार्या या फळाला गरिबांचे फळही म्हटले जाते. मात्र, वर्षभर एकाच दरात मिळणारे हे फळ आता महाग झाले आहे. पाण्याच्या तुटवड्यामुळे लागवडीत घट होऊन उत्पादनात झालेली घट तसेच निर्यातही कायम असल्याने पुण्यातील बाजारात केळी कमी प्रमाणात येत आहे. मात्र, श्रावणामुळे केळीला चांगली मागणी असल्याने केळीचे प्रतिडझनाचे दर 60 ते 80 रुपयांवर पोहचले आहे.
यंदा राज्यात पाण्याच्या तुटवड्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे बहुतांश शेतकर्यांनी केळीच्या लागवडीकडे पाठ फिरवली. त्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली. याखेरीज दर्जेदार केळींची निर्यातही मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने पुण्यातील बाजारात केळींची आवक रोडावली आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या केळी बाजारात दररोज 10 ते 15 गाड्यांची आवक होत आहे. एरवी हीच आवक 20 ते 25 गाड्या इतकी होते. सद्य:स्थितीत आवक खूपच कमी असल्याने केळीच्या भावात डझनामागे दहा ते वीस रुपयांची वाढ झाली आहे.
पाण्याच्या अनुपलब्धतेमुळे लागवडीत झालेली घट, याखेरीज निर्यातीत झालेली वाढ, या सर्वांचा परिणाम केळीच्या दरावर झाला आहे. पुढील काही दिवस हीच परिस्थिती कायम राहील. यापूर्वी घाऊक बाजारात केळीचे दर प्रतिकिलोचे 17 रुपयांवरही गेले होते. मात्र, किरकोळ बाजारात डझनाचे दर 80 रुपये किलोवर जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.
अनिकेत वायकर, केळी व्यापारी, मार्केट यार्ड
केळी गावरान केळी, सोनकेळी
आवक 10 ते 15 वाहने (दररोज)
कोठून सोलापूर, जुन्नर, नेवासा,
बारामती, जळगाव
घाऊक दर 12 ते 17 रुपये (प्रतिकिलो)
किरकोळ दर 60 ते 80 रुपये (प्रतिडझन)