Anjangaon To Pattankodoli Foot Pilgrimage
मोहोळ शहर : श्री क्षेत्र विठ्ठल-बिरदेव देवस्थान, पट्टणकोडोली (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथील देवस्थानचे माजी मुख्य मानकरी विश्वनाथ नारायण वाघमोडे ऊर्फ फरांडे बाबा (वय १०२ वर्षे) यांचे गुरुवारी (दि. २७) त्यांच्या मूळ गावी अंजनगाव (ता. माढा) येथे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने धार्मिक परंपरेचा अखंड वारसा जपणारे, श्रद्धा, अध्यात्म आणि सात्त्विक जीवनमूल्यांची शिकवण देणारे एक आदरणीय व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. त्यांच्या निधनामुळे भाविक, भक्तगण आणि धार्मिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
पट्टणकोडोली येथील श्री क्षेत्र विठ्ठल-बिरदेव देवस्थानच्या यात्रेला ऐतिहासिक आणि धार्मिक परंपरेचे विशेष महत्त्व आहे. या यात्रेत भाकणूक करण्याचा मुख्य मान अंजनगाव (ता. माढा) येथील खेळोबा देवस्थानच्या गादीवरील पूज्य व्यक्तीला परंपरेने प्राप्त झाला आहे. ही परंपरा केवळ धार्मिक विधी नसून अनेक पिढ्यांपासून जपला गेलेला श्रद्धेचा आणि भक्तिभावाचा वारसा आहे. फरांडे बाबा यांनी या परंपरेचे अत्यंत निष्ठेने पालन करत तब्बल ७२ वर्षे अंजनगाव ते पट्टणकोडोली अशी पायी वारी केली. वयाची शंभरी ओलांडल्यानंतरही त्यांच्या जीवनातील धार्मिक निष्ठा आणि देवस्थानप्रती असलेली आस्था भाविकांसाठी प्रेरणादायी ठरली.
आदमापूर येथील श्री संत बाळूमामा आणि फरांडे बाबा यांच्यात अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. संत बाळूमामा दरवर्षी पट्टणकोडोली यात्रेसाठी पायी वारी करत असत. या धार्मिक प्रवासादरम्यान संत बाळूमामा स्वतः फरांडे बाबांसोबत पंगतीत बसून भोजन करत असत. दोघांमधील हा स्नेहभाव, आपुलकी आणि आध्यात्मिक नाते यात्रेच्या इतिहासातील एक अविस्मरणीय आठवण म्हणून जपले गेले आहे.
फरांडे बाबा हे केवळ धार्मिक परंपरेचे मानकरी नव्हते, तर सामाजिक आणि कौटुंबिक प्रश्नांवर योग्य मार्गदर्शन करणारे अनुभवी व्यक्तिमत्त्व म्हणूनही त्यांची ओळख होती. पंचक्रोशीतील अनेक सामाजिक तसेच कौटुंबिक वाद आणि प्रश्न सोडवण्यासाठी नागरिक त्यांच्याकडे येत असत. त्यांच्या अनुभवपूर्ण मार्गदर्शनाला परिसरात विशेष महत्त्व होते. त्यांच्या शब्दाला अंतिम मान दिला जात असे. धार्मिक अधिष्ठान, सात्त्विक वृत्ती, संयमी स्वभाव आणि सर्वांशी आपुलकीने वागण्याची पद्धत यामुळे त्यांनी भाविकांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले होते.
वयाच्या १०२ वर्षांपर्यंत फरांडे बाबा यांनी धार्मिक परंपरेचा वारसा अत्यंत निष्ठेने जपला. मात्र, प्रकृतीच्या कारणामुळे अलीकडील काळात पट्टणकोडोली यात्रेतील भाकणूक करण्याचा मुख्य मान त्यांचे नातू खेळोबादेव ऊर्फ नानादेव वाघमोडे फरांडे महाराज यांच्याकडे सोपवण्यात आला होता. त्यामुळे त्यांनी आयुष्यभर जपलेली धार्मिक परंपरा पुढील पिढीकडे सुपूर्द झाली. त्यांच्या मार्गदर्शनातून आणि संस्कारांतून हा वारसा पुढे सुरू राहणार आहे.
फरांडे बाबा यांचा भक्तपरिवार केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नव्हता. मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा, उत्तर प्रदेश आदी राज्यांतही त्यांचे मोठ्या संख्येने भक्तगण होते. धार्मिक कार्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी अनेकांच्या जीवनात मार्गदर्शकाची भूमिका बजावली. त्यांच्या निधनाने धार्मिक क्षेत्रातील एका प्रदीर्घ परंपरेचा साक्षीदार आणि मार्गदर्शक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात पाच मुले, चार मुली, सुना, जावई, नातू, पणतू असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने अंजनगावसह मोहोळ-माढा परिसरातील नागरिक, पट्टणकोडोली देवस्थानचे भाविक आणि देशभरातील भक्तगणांमध्ये शोककळा पसरली आहे. ७२ वर्षांची पायी वारी, संत बाळूमामांशी असलेला जिव्हाळा आणि आयुष्यभर जपलेली धार्मिक निष्ठा यांमुळे फरांडे बाबा यांचे कार्य भाविकांच्या स्मरणात कायम राहणार आहे.