

हुपरी : विठ्ठल-बिरदेव यांच्या भक्तीचा झेंडा सातासमुद्रापार पोहोचविणारे आणि लाखो भाविकांच्या मनात श्रद्धेचे स्थान निर्माण करणारे पट्टणकोडोलीच्या विठ्ठल- बिरदेव देवस्थानचे प्रसिद्ध भाकणूककार विश्वनाथ नारायण वाघमोडे ऊर्फ फरांडे बाबा (वय १०२) यांचे सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अंजनगाव येथे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच विठ्ठल-बिरदेव भक्त परिवारासह संपूर्ण वारकरी आणि भाविकांमध्ये शोककळा पसरली.
फरांडेबाबा यांनी विठ्ठल-बिरदेव यांच्या भक्तीचा आणि परंपरेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी आयुष्यभर अविरत कार्य केले. आपल्या भक्तिमय सेवेतून त्यांनी असंख्य भाविकांना अध्यात्म, श्रद्धेची आणि भक्तीची प्रेरणा दिली.
महाराष्ट्रासह देश-विदेशात विठ्ठल-बिरदेव यांचे महात्म्य पोहोचविण्यात त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. त्यांनी १९५२ पासून पट्टणकोडोलीत भाकणूक सांगायला सुरुवात केली. त्यांनी सलग ६० वर्षे भाकणूक केली. त्यानंतर २०१२ मध्ये त्यांनी नातू नाना खेलोबा यांच्याकडे आपला वारसा सोपवला.