करमाळा : भारतामध्ये अतिशय दुर्मीळ असलेला पोवळा साप करमाळा येथील नगरपरिषद वाचनालयाजवळ आढळून आला. त्याला सर्पमित्रांनी निसर्गाच्या सान्निध्यात सोडून दिले.
नगरपालिकेच्या वाचन मंदिरात साफसफाई करीत असताना पालिकेचे सेवक प्रदीप कुठे यांना फरशीच्या सांधित हा साप आढळून आला. याची माहिती त्यांनी सर्पमित्रांना दिली. सर्पमित्र किरण मोरे, रोहित चौगुले यांनी सापाला पकडले. किरण मोरे यांनीही तत्काळ त्या सापाला एका बाटलीत बंद करून सर्पमित्र प्रशांत भोसले यांना संपर्क करून याची माहिती दिली. सर्पमित्र भोसले घटनास्थळी पोहोचले व साप ताब्यात घेऊन तो साप पोवळा असल्याचे सांगितले. उपस्थितांना सापाबद्दलची संपूर्ण माहिती दिली. त्यानंतर त्या सापास निसर्गाच्या सान्निध्यात सोडण्यात आले. क्वचितच आढळणारा पोवळा हा साप अतिशय दुर्मीळ आहे. या परिसरात या आधी कधी सापडलेला नाही.
हा साप जाडीने कमी असतो. तसेच त्याचा रंग फिक्कट तपकिरी आणि डोके व मानेचा रंग काळा तर शेपटीवर दोन काळ्या कडी असतात. जमिनीखाली, गवत किंवा दगडांच्या खाली तो वास्तव्यात असतो. हा साप अतिशय विषारी असून तो मानवी वस्तीत आढळत नाही. या सापाचे विष निरोटॉक्ससिक असल्यामुळे तो चावल्यास सूज येणे, चावलेल्या भागात यातना होणे. उपचार न मिळाल्यास तास ते दीड तासांनी श्वसन क्रियेत अडथळा येऊन मृत्यू होणे असे प्रकार घडतात. असे सर्पमित्र प्रशांत भोसले यांनी सांगितले.