
सोलापूर : शहरातील सदर बाझार, विजापूर नाका व फौजदार चावडी पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार गंगाराम उर्फ गंग्या किसनसिंग बोधीवाले (वय ३४, रा. घर नंबर ०६ लोधी गल्ली, उत्तर सदर बाझार याच्या विरुद्ध एमपीडीए अन्वये कारवाई करण्यात आली. त्याला एक वर्षासाठी पुणे येथील येरवडा कारागृह येथे स्थानबद्ध करण्यात आले आहे.
सराईत गुन्हेगार गंगाराम उर्फ गंग्या बोधीवाले याच्याविरुद्ध २०१२, २०१५ आणि २०१७ मध्ये एमपीडीए कायद्यान्वये व २०२३ मध्ये प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. त्यानंतरही त्याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही. त्याने सार्वजनिक सुव्यवस्थेत बाधा होईल अशी गुन्हेगारी कृत्य सूरूच ठेवली. त्याच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचे ७ गुन्हे शहरात दाखल आहेत. त्यामुळे त्याच्या गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी २१ ऑक्टोबर रोजी त्याच्या विरुद्ध एमपीडीए अन्वये स्थानबद्धतेचे आदेश काढले.
ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त गुन्हे डॉ. दिपाली काळे, पोलीस उपायुक्त (परिमंडळ) विजय कबाडे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) राजन माने, सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग-०२ यशवंत गवारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील दोरगे, सदर बाझार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे, एमपीडीए पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम घाडगे व अंमलदार पोलीस हेडकॉन्स्टेबल विनायक संगमवार, पोलीस हेडकॉन्स्टेबल सुदीप शिंदे, अक्षय जाधव, विशाल नवले यांनी केली.