Uddhav Thackeray Eknath Shinde Operation Tiger: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. नाशिक महापालिकेतील ठाकरे गटाच्या काही नगरसेवकांशी शिंदे गटाचा संपर्क सुरू असल्याची माहिती समोर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे गटातील 10 ते 12 नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. या नगरसेवकांसोबत वरिष्ठ नेत्यांच्या बैठका झाल्याचेही बोलले जात आहे.
याचबरोबर संबंधित नगरसेवकांना प्रभागनिहाय सुमारे पाच कोटी रुपयांच्या विकास निधीचे आश्वासन दिल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र, या दाव्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते यांनी राज्यातील विविध पक्षांतील अनेक पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी शिवसेनेत प्रवेश करण्यास इच्छुक असल्याचा दावा केला आहे.
त्यांच्या म्हणण्यानुसार, हे कोणतेही ऑपरेशन नसून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाकडे वाढत असलेले आकर्षण आहे. आगामी जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणखी अनेक राजकीय प्रवेश होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, केवळ नाशिकमध्येच नव्हे तर इतर जिल्ह्यांमध्येही राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत. रायगडमध्ये शिंदे गटाला धक्का बसला असून, रोहा तालुक्यातील शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख मनोज शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे रोहा तालुक्यातील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मुंबई महानगरपालिकेतील मानखुर्द-शिवाजीनगर प्रभागातील AIMIM च्या नगरसेविका रोशन शेख यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यानंतर त्यांचे नगरसेवकपद रद्द झाले आहे.
यामुळे त्या प्रभागातील दुसऱ्या क्रमांकावरील भाजप उमेदवाराला नगरसेवक होण्याची संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेतील भाजपची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना विविध पक्षांमध्ये पक्षांतर, संपर्क मोहीम आणि संघटनात्मक बांधणीला वेग आला आहे. नाशिकमधील नगरसेवकांच्या संभाव्य पक्षांतराच्या चर्चेमुळे शिवसेनेतील राजकीय घडामोडींना नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, ठाकरे गटातील नगरसेवकांच्या संभाव्य प्रवेशाबाबत किंवा निधीच्या चर्चेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसून, संबंधित घडामोडींवर सर्वांचे लक्ष आहे.