सातारा

सातारा : सातार्‍यात दीड हजार थकबाकीदारांना नोटीस

मोनिका क्षीरसागर

सातारा : पुढारी वृत्‍तसेवा
सातारा शहर व उपनगरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाची पाणी बिलापोटी कोट्यवधींची थकबाकी आहे. सतत पाठपुरावा करूनही दुर्लक्ष करणार्‍या सुमारे 1 हजार 500 थकबाकीदारांवर कारवाई करुन मिळकतींवर बोजा चढवण्याचा इशारा प्राधिकरणाने दिला आहे. नळकनेक्शन बंद करण्याची मोहीम सुरु केल्याने थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत.

सातारा शहरातील सदरबझार, तामजाईनगर, दौलतनगर, विलासपूर, गोडोली, शाहूनगर, शाहूपुरी या भागास तसेच कृष्णानगर, संगमनगर, पिरवाडी, वनवासवाडी, खिंडवाडी परिसरास महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणीपुरवठा केला जातो. या भागास मीटर रिडिंगनुसार पाणी बिल आकारले जाते. पाणी वापरानुसार बिलाचे स्लॅब ठरवले जातात. घरगुती आणि व्यावसायिक अशा प्रकारानुसार पाणी बिलाची वर्गवारी केली जाते. ग्राहकांनी पाणीबिले वेळेत भरावीत यासाठी प्राधिकरणाकडून सतत पाठपुरावा केला जातो. मात्र तरीही त्याकडे काही ग्राहक दुर्लक्ष करतात. त्यामुळे सतत थकबाकीदार असलेल्या सुमारे 1 हजार 500 ग्राहकांना कारवाईची इशारा नोटीस देण्यात आली आहे.

प्राधिकरणाचे ग्राहक असताना लेखी तसेच अभय योजनेतून व्याजमाफीची सवलत देऊनही पाणी बिलाची थकबाकी भरली नाही. थकबाकी असल्यामुळे नाइलाजाने आपली नळजोडणी बंद करण्यात येत आहे. नळजोडणी अन्य मार्गाने जोडून घेवू नये. तसे निदर्शनास आल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. थकबाकी व नळजोडणी बंद करण्याची तसेच पुन्हा नळ कनेक्शन सुरु करण्याची फी भरून नळजोडणी पुन्हा सुरु करून घ्यावी लागणार आहे. नळजोडणी बंद केली म्हणजे पाणी बिल माफ झाले असे न समजू नये. थकबाकी न भरल्यास मिळकतीवर बोजा चवढण्याचा इशारा प्राधिकरणाने दिला आहे. थकबाकी वसूल व्हावी यासाठी प्राधिकरणाने प्रथमत:च पाणीपुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेतली आहे. ग्राहकांनी वेळेवर थकबाकी भरुन कारवाईचा कटू प्रसंग टाळावा व प्राधिकरणास सहकार्य करावे, असे आवाहन कार्यकारी अभियंता पल्‍लवी मोटे यांनी केले आहे.

सरकारी कार्यालयांकडेही प्रचंड थकबाकी

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची नागरिकांसोबतच सरकारी कार्यालयांनीही प्रचंड थकबाकी ठेवली आहे. ही सरकारी कार्यालये मार्च एंडच्या तोंडावर सर्वसामान्यांच्या मागे वसुलीसाठी तगादा लावताना दिसत आहेत. मात्र त्यांच्याकडे प्राधिकरणाची लाखोंची तर काही ठिकाणी कोट्यवधींची वसुली असल्याचे दिसून येते. सरकारी कार्यालयांनीही तातडीने थकबाकी जमा करणे आवश्यक आहे.

हेही वाचलत का ?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT