सातारा : पुढारी वृत्तसेवा
सातारा व कोल्हापूरच्या राजेंविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी अटक करून शुक्रवारी सातारा जिल्हा न्यायालयात हजर केले असता, त्यांना सहावे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. ए. शेंडगे यांनी सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. विविध मुद्द्यांचा तपास करायचा असल्याचा सरकार पक्षाचा युक्तिवाद न्यायालयाने मान्य केला. दरम्यान, न्यायालयात दोन्ही पक्षांचा जोरदार युक्तिवाद सुरू असताना दोनवेळा चांगलीच खडाजंगी झाली.
अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना गुरुवारी सायंकाळी सातारा शहर पोलिसांनी अटक केली. त्यांच्या विरुध्द 9 ऑक्टोबर 2020 रोजी तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केल्याप्रकरणी राजेंद्र निकम (रा.तारळे ता.पाटण) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. अॅड. सदावर्ते एका न्यूज चॅनलवर मत मांडत असताना त्यांची जीभ घसरली त्यावरुनच सातार्यात गुन्हा दाखल झाला आहे.
अॅड. सदावर्ते यांना गुरुवारी अटक केल्यानंतर त्यांची रात्र सातारा शहर पोलिस ठाण्याच्या लॉकअपमध्ये गेली. शुक्रवारी सकाळी त्यांना न्यायालयात हजर करायचे असल्याने सातारा पोलिसांनी लॉकअप परिसर, पोवई नाका व जिल्हा न्यायालय परिसरात चोख बंदोबस्त ठेवला होता. 11 वाजून 10 मिनिटांती सदावर्ते यांना लॉकअपमधून बाहेर काढले. 11.25 मिनिटांनी न्यायाधिशांसमोर उभे केले. नाव व काही तक्रार आहे का? असा प्रश्न कोर्टाने सदावर्ते यांना विचारल्यानंतर त्यांनी नाव सांगून कोणतीही तक्रार नसल्याचे सांगितले.यानंतर या प्रकरणाच्या तपासी अधिकार्यांनी कोर्टासमोर बाजू मांडली. नेमकी घटना काय व पोलिस तपासासाठी त्यांच्या पोलिस कोठडीची कशी आवश्यकता आहे हे एका मिनिटांमध्ये सांगितले. सरकार पक्षाच्यावतीने अॅड. अंजुम पठाण यांनी जोरदार युक्तिवाद केला. अॅड. सदावर्ते यांनी केलेले वक्तव्य गंभीर आहे. ते वक्तव्य कोणाच्या सांगण्यावरुन केले आहे का? यामध्ये आणखी कोणाचा समावेश आहे का? गुन्हा दाखल झाल्यानंतर समजपत्र दिल्यानंतरही ते पोलिसांसमोर का हजर झाले नाहीत? ते कोणत्या संघटनेत काम करतात? सदावर्तेे यांच्या आवाजाचे नमुने घ्यायचे आहेत. अशा वक्तव्याचा नेमका उद्देश कोणता? याचा तपास करायचा असल्याची बाजू अॅड. अंजुम पठाण यांनी मांडली.अॅड. अजय मोहिते यांनीही सरकार पक्षाच्यावतीने युक्तिवाद केला.
सरकार पक्षाचा युक्तिवाद झाल्यानंतर अॅड. सदावर्ते यांच्या बाजूने बचावपक्ष म्हणून अॅड. सचिन थोरात व सतीश सुर्यवंशी यांनी युक्तिवाद केला. त्यांनी सरकार पक्षाचे सर्व मुद्दे खोडून काढण्यास सुरुवात केली. दोन्ही वकील म्हणाले, कायद्याने अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे. अॅड. सदावर्ते हे कायद्याचे उच्च शिक्षित व्यक्ती असून हे वक्तव्य एका न्यूज चॅनेलवर बोलताना बोलले आहेत. यामुळे ते वक्तव्य पूर्णत: त्यांचेच असून कोणाच्यातरी सांगण्यावरुन बोलण्याचा विषय येत नाही. अर्थात यामुळे यामध्ये इतर कोणत्या व्यक्तीचा सहभाग असण्याचा सवालच येत नाही. पोलिसांनी समजपत्र दिले असले तरी त्यावर चौकशीसाठी कधी हजर रहावे, याचा उल्लेख नव्हता. तसेच कोरोना कालावधी असल्याने उपस्थित राहण्यास अडथळे आले आहेत. आवाजाचे नमुने घ्यायचे असतील तर त्यासाठी आमची तयारी असून आत्ता लगेच देण्यास तयारी आहे. घटनास्थळाचा पंचनामा करायचा असेल तर पोलिसांनी न्यूज चॅनेलला अर्ज देवून घटनास्थळाचा पंचनामा करावा. त्यासाठी पोलिस कोठडीची आवश्यकता नसल्याची बाजू सदावर्ते यांच्या वकीलांनी मांडली.
दोन्ही पक्षाचा युक्तिवाद सुरु असतानाच दोन घटनांमुळे वकीलांची शाब्दीक जुंपली. बचाव पक्ष बोलताना म्हणाले की, खा. उदयनराजे भोसले प्रतिष्ठित आहेत तर मग निवडणुकीमध्ये का पडले? यावर सरकार पक्षाने तीव्र आक्षेप घेतला. न्यायालयात याचा काहीही संबंध येत नसून अजूनही आक्षेपार्ह वक्तव्य सुरुच आहेत. ही चूक बचाव पक्षाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी हे शब्द माघारी घेत असून त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत असल्याचे सांगत माघार घेतली. मात्र यावरही सरकार पक्ष शांत राहिले नाहीत व सुमोटो याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही त्यांनी केली. दुसर्या घटनेत बचाव पक्ष बोलताना 'संभाजी भोसले आमचे मित्र आहेत', असे म्हणाले. यावरही सरकार पक्षाने आक्षेप घेत. 'तुमचे मैत्रीचे संबंध असतील तर व्यक्तीगत ठेवा. हे सार्वजनिक आहे. आमच्यासह लाखो अनुयायांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आदर्श आहेत,' असे सुनावताच त्याबद्दलही बचाव पक्षाच्या वकीलांनी माफी मागितली.
मराठा क्रांती मोर्चाचे राजेंद्र निकम यांनी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात फिर्याद दाखल केली. सातारा न्यायालयात अॅड. सदावर्ते यांना आणल्यानंतर त्यांना जास्तीत जास्त पोलिस कोठडी मिळावी, यासाठी सहायक जिल्हा सरकारी वकील अॅड.अंजुम फिरोज पठाण यांनी जोरदार व सडेतोड युक्तिवाद केला. अॅड. सदावर्ते यांना जास्तीत जास्त कोठडी का मिळावी? यासाठी अॅड. पठाण यांनी विविध कलमांचा व विविध खटल्यांमधील संदर्भ देत अभ्यासपूर्ण मांडणी केली. त्याचा फायदा सरकार पक्षाला झाला व अॅड. सदावर्ते यांना चार दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. मराठा व मुस्लिम समाजांमध्ये तेढ निर्माण करणारे अनेक प्रसंग घडत असतात. मात्र, मराठा क्रांती मोर्चासाठी न्यायालयात एक मुस्लिम रणरागिणी लढली व त्यांनी मराठा क्रांती मोर्चाला न्याय मिळवून दिला, अशा प्रतिक्रिया सर्वत्र उमटत आहेत.
तक्रारदार राजेंद्र निकम यांच्या वतीने अॅड. अजय मोहिते यांनीही सरकार पक्षाच्या वतीने प्रभावी बाजू मांडली. ते म्हणाले, सरकार पक्षाने योग्य मुद्दे मांडले असून त्या घटनास्थळाचा पंचनामा होणे गरजेचा असल्याचे निदर्शनास आणले. यामुळे किमान 14 दिवसांची पोलिस कोठडी मिळावी, अशी मागणी त्यांनी केली. अखेर न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी दिली. अॅड. मोहिते यांनी बिनतोड युक्तिवाद केल्याने मराठा क्रांती मोर्चाने त्यांना धन्यवाद दिले.