सातारा

सातारा : माण तहसीलदारांची उचलबांगडी; प्रांतांना नोटीस

Shambhuraj Pachindre

सातारा : पुढारी वृत्तसेवा

वाकी, ता. माण येथील अवैध वाळू उपशाबाबतच्या कारवाईवेळी हातमिळवणी करणे माण तहसिलदार व तलाठ्यांना चांगलेच भोवले आहे. या प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले यांची उचलबांगडी करण्यात आली असून त्यांच्या जागी रिचर्ड यानथन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रांताधिकारी व तलाठ्यांनाही कारणेदाखवा नोटीस बजावली आहे. जिल्हाधिकार्‍यांच्या या कारवाईने महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

दै. 'पुढारी'ने बेकायदा वाळू बाबत प्रसिद्ध केलेल्या वृत्ताला या कारवाईने दुजोराच मिळाला आहे. 'माणदेशात अधिकार्‍यांच्या पाठबळाने वाळूची लूट' या शिर्षकाखाली दै. 'पुढारी'ने वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी बेकायदा वाळू प्रकरणी ठोस कारवाईचे आदेश दिले होते. मात्र, तरीही वाकी येथील कारवाई दरम्यान, गोलमाल झाल्याचे समोर आले. त्यामुळे तहसिलदार, प्रांत व तलाठी यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

वाकी येथे वाळूचोरीचे प्रकरण उजेडात आणून अवैध वाळू व्यावसायिकांंविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी जाऊनही पोलिसांनी तक्रार घेतली नसल्याचा अहवाल मंडलाधिकार्‍यांनी दिला होता. मात्र, जिल्हाधिकार्‍यांकडे घडलेल्या वस्तुस्थितीचा व्हिडीओ पोहोचल्याने तलाठ्यापासून प्रांतांपर्यंत सार्‍यांचीच पोलखोल झाली.

जिल्हाधिकार्‍यांनी तलाठी संतोष ढोले, तहसीलदार सूर्यकांत येवले व प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. वाळूचोरी रोखण्यासाठी केलेल्या गस्त पथकातील म्हसवडच्या मंडलाधिकार्‍यांनी 22 फेब्रुवारी रोजी रात्री 1.20 वाजता वाकी येथील माणगंगा नदीमधील वाळूचे खड्डे व एक ट्रॅक्टर त्यांचे समोरुन अंधाराचा गैरफायदा घेवून पळून गेला.

तद्नंतर या ठिकाणी 10 ते 12 अनोळखी लोक जमा झाले. त्यामुळे पथक त्याठिकाणाहून निघून गेल्याचा अहवाल सादर केला. संबधित व्यक्तीवरती गुन्हा दाखल करण्यासाठी दिलेल्या सुचनेनुसार म्हसवडचे मंडलाधिकारी म्हसवड पोलिस ठाण्यात गेले असता सहाय्यक पोलिस निरीक्षकांनी गुन्हा दाखल करून घेणार नाही. त्या पत्राची पोहच देणार नाही, असे सांगितले. त्यांनी पत्र घेतले नाही. पथक रात्री 9.50 पर्यंत पोलिस स्टेशनमध्ये थांबल्याचा अहवाल 23 फेब्रुवारी रोजी तहसीलदारांकडे सादर केला.

मात्र, त्याच 23 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकार्‍यांच्या व्हाट्सअ‍ॅप वरती एक ऑडीओ व व्हिडीओ क्लीप आली. त्याची त्यांनी पहाणी केली असता सबंधित पथकाने वाळूने भरलेला ट्रॅक्टर सापडल्याचे दिसून आले. तसेच त्या व्हिडिओमध्ये तलाठ्याचा नामोल्लेख असल्याचे निदर्शनास आले. असे असताना सुध्दा मंडलाधिकारी यांनी आपणास चुकीचा अहवाल सादर केला व तहसिलदारांनी वस्तुस्थितीची खातरजमा न करता त्या मंडलाधिकार्‍याला अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्याबाबत पत्र दिले.

या कृतीव्दारे महसूल प्रशासनाची प्रतिमा मलीन केल्याचा ठपका जिल्हाधिकार्‍यांनी तहसीलदारांवर ठेवला असून आपणावर शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये, अशी नोटीस बजावली आहे. शिवाय त्यांची उचलबांगडी करण्यात आली असून अद्याप त्यांना नियुक्ती देण्यात आलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT