सातारा

सातारा : ‘नगररचना’ला १४ कोटींचे उच्चांकी उत्पन्‍न

सोनाली जाधव

सातारा : आदेश खताळ
सातारा शहराची हद्दवाढ झाल्यानंतर नागरीकरणाला वेग आला आहे. नवे गृहप्रकल्प उभारले जावू लागले असून, त्यासाठीच्या परवान्यावर आकरल्या जाणार्‍या विविध शुल्कांमधून नगररचना विभागाला (शहर विकास विभाग) एकाच वर्षांत सुमारे 14 कोटींचे उच्चांकी उत्पन्न मिळाले. त्यातून नगरपालिकेच्या खजिन्यात मोठी भर पडू लागली आहे. या विभागाने तीन वर्षांत 15 कोटी 35 लाख 98 हजार 651 रुपयांचा महसूल गोळा केला.

सातारा शहराची हद्दवाढ झाल्यामुळे रहिवास क्षेत्राचा मोठ्या प्रमाणावर समावेश झाला. कोरोना साथ नियंत्रणात आल्यामुळे बांधकाम क्षेत्राने गती घेतली आहे. शहर हद्दीत मोठ्या प्रमाणावर गृहप्रकल्प साकारण्यात येत आहेत. गेल्या चार-पाच महिन्यांत मंजुर्‍या मिळालेल्या गृहप्रकल्पांची संख्या लक्षणीय आहे. हद्दवाढ भागात विकासाला वाव असल्यामुळे मोठ्या प्रमाणात बांधकाम परवाने घेण्यात आले. या परवान्यासाठी नगरपालिकेच्या नगररचना विभागाकडे वेगवेगळी शुल्क भरावी लागतात. त्यामधून नगरपालिकेला उत्पन्न मिळत असते. गेल्या तीन वर्षांत नगरपालिकेला 15 कोटी 35 लाख 98 हजार 651 रुपयांचे उत्पन्न मिळाले.

बांधकाम परवाना देताना विविध प्रकारची 9 शुल्क आकारली जातात. तीन वर्षांत प्रिमियमच्या माध्यमातून 5 कोटी 77 लाख 93 हजार 487 रुपये, परवाना नोंदणी व नूतनीकरणातून 1 लाख 45 हजार 133 रुपये, प्रिमियम शुल्कमधून 1 लाख 52 हजार 429 रुपये, छाननी फीमधून 16 लाख 76 हजार 596 रुपये, वाढीव चटई क्षेत्र प्रिमियममधून 3 कोटी 16 लाख 72 हजार 168 रुपये, विकास करातून 6 कोटी 19 लाख 33 हजार 288 रुपये, स्कुटनी फी 2 लाख 24 हजार 550 रुपये तर ना हरकत दाखल्यातून 1 हजार रुपये असे नगररचना विभागातून नगरपालिकेला उत्पन्न मिळाले आहे. 1 टक्क्यानुसार जमा झालेला उपकर सुमारे 8 कोटी
आहे.

कामगार कल्याण उपकर शासनास जमा करण्यात आला आहे. प्रिमियम, विकास कर व इतर शुल्कातून नगरपालिकेला गेल्या वर्षी चांगले उत्पन्न मिळाले. वसुली विभागापेक्षा जादा महसूल शहर विकास विभागाने मिळवून दिला आहे. या विभागाचे संख्याबळ कमी असतानाही कर्मचारी व अधिकार्‍यांनी चांगली कामगिरी केली.
– अभिजीत बापट, मुख्याधिकारी, सातारा

मुख्याधिकार्‍यांकडून 'शहर नियोजन'चे कौतुक

वसुली विभाग हा नगरपालिकांच्या उत्पन्नांचा मुख्य स्रोत असतो. मात्र सातारा शहरात मिळकत कराची प्रचंड थकबाकी असल्यामुळे नगरपालिकेच्या उत्पन्नात अपेक्षित वाढ झालेली नाही. त्या तुलनेत शहर नियोजन तथा शहर विकास विभागाने वर्षभरात गेलेल्या कामगिरीमुळे नगरपालिकेला एकाच वर्षात 12 कोटींचा महसूल मिळाला. शहरासोबतच हद्दवाढ भागात ताण असतानाही या विभागातील नगररचनाकार अनिल पाटील, सहायक नगररचनाकार सायली कदम, रचना सहायक अक्षय साळुंखे, स्वानंद मोगरकर, भाग निरीक्षक सतीश साखरे, श्रीकांत गोडसे, प्रकाश शिर्के यांनी केलेल्या कामाचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी कौतुक केले. गेल्या महिन्यात झालेल्या अर्थसंकल्पीय सभेत नियोजन विभागाच्या टीमचा अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला.

नगररचनाच्या उत्पन्‍नात अशी झाली वाढ

2021-2022 या एकाच वर्षात 13 कोटी 91 लाख 65 हजार 998 रुपयांचे उच्चांकी उत्पन्न नगररचनाच्या माध्यमातून मिळाले आहे. त्यापूर्वी 2020-2021 या वर्षी 3 कोटी 54 लाख 51 हजार 608 रुपयांचे उत्पन्न मिळाले. 2019-2020 मध्ये उपकर वगळता 75 लाख 79 हजार 744 रुपये नगररचना विभागाच्या माध्यमातून नगरपालिकेला मिळाले होते. कोरोना संसर्गाचा फैलाव झाल्यामुळे लॉकडाऊन काळात उत्पन्नात घट झाल्याचे स्पष्ट होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT