सातारा

सातारा : …टॉवर नावाला, उपयोग काय गावाला? ; बीएसएनएलची सेवा वारंवार खंडित

मोनिका क्षीरसागर

येळगाव (सातारा) : पुढारी वृत्तसेवा
माहिती तंत्रज्ञानाच्या प्रगत युगात मोबाईल नेटवर्किंगमुळे जग अधिकच जवळ आले आहे. ऑनलाईनच्या जमान्यात मोबाईल चैनीची वस्तू राहिली नसून अत्यावश्यक गरज बनली आहे. मात्र 'माणसं जोडणारी माणसं'हे ब्रीदवाक्य असलेल्या आणि कनेक्टिंग इंडियाचा नारा देत देशभरात कार्यरत असलेल्या बीएसएनएल अर्थात भारत संचार निगमची संपर्क यंत्रणा वारंवार खंडित होत असल्याने येवतीसह परिसरातील मोबाईलधारक त्रस्त झाले आहेत.

डोंगर रांगांच्या कुशीत वसलेल्या येवती परिसरात प्रत्येकाच्या हातात मोबाईल पाहायला मिळतात आहे. भारतसंचारचे एकमेव नेटवर्क असल्याने आणि तेसुद्धा वारंवार खंडित होत असल्याने बॅलन्स मारण्यापुरती रेंज आणि बराच काळ आऊट ऑफ कव्हरेज अशी येथील परिस्थिती आहे. रस्त्यावर रेंज आणि घराघरात आऊट ऑफ रेंज ही बाब नित्याचीच होऊन बसली आहे. काटेकरवाडीत तर लोकांना मोबाईल चौकटीच्या बाहेर खिळ्याला किंवा थेट उंच माडीवर ठेवावे लागतात. या ठिकाणी बीएसएनएलचा मोबाईल टॉवर घराळवाडीत म्हणजेच डोंगरावर आणि लोकवस्त्या पायथ्याशी अशी परिस्थिती आहे.

ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, बँका-पतसंस्था, आरोग्य केंद्रे, पोस्ट ऑफिस, पुरवठा विभागाने स्वस्त धान्य वाटप ऑनलाईन केले आहे. मात्र वारंवार खंडीत होणार्‍या मोबाईल नेटवर्क तसेच इंटरनेट अभावी सर्वांचेच हाल होत आहेत. त्यामुळे आर्थिक भार सोसावा लागत असून गैरसोय लोकांच्या जणू अंगवळणीच पडली आहे. त्यामुळे साहजिकच 'मोबाईल टॉवर नावाला… उपयोग काय गावाला?' अशीच येवती परिसरातील गावांची अवस्था आहे.

खा. श्रीनिवास पाटील यांनी लक्ष घालावे..

खा. श्रीनिवास पाटील यांनी पूर्वीच्या कारकिर्दीत डोंगरी आणि दुर्गम भागात दूरसंचार सुविधा दर्जेदार मिळावी यासाठी ऑप्टिकल फायबर केबल टाकायला लावली होती. यानंतर काही वर्षे ही सेवा व्यवस्थित सुरू होती. मात्र आता सुविधेचा पुरता बोजवारा उडाला आहे. म्हणून खा. श्रीनिवास पाटील यांनी लक्ष घालून बीएसएनएलची सेवा सुरळीत करण्याबाबत संबंधितांना सूचना कराव्यात, अशी मागणी जनतेतून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT