सातारा

वाई पालिकेचा 56 कोटींचा अर्थसंकल्प

Shambhuraj Pachindre

वाई : पुढारी वृत्तसेवा

वाई नगरपालिकेचा कोणतीही करवाढ नसलेला 56 कोटींचा अर्थसंकल्प 33 लाख शिलकीसह मंजूर झाला. त्यामुळे वाईकरांनी या अर्थसंकल्पाचे स्वागत केले.

मुख्याधिकारी तथा प्रशासक किरणकुमार मोरे यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय कार्यकारी समिती सदस्यांच्या उपस्थितीत शुक्रवारी झालेल्या बैठकीत लेखापाल रोशन गायकवाड यांनी पालिकेचा अर्थसंकल्प सादर केला. त्यानुसार शहरातील विविध भागात लावण्यात येणारे फ्लेक्सबोर्ड तसेच प्रसिद्ध करण्यात आलेल्या विविध जाहिरातींसाठी जाहिरात धोरण तयार करण्यात येणार असून नगरपालिकेच्या उत्पन्नात भरघोस वाढ होणार आहे. पुढील आर्थिक वर्षापासून शहरात होणार्‍या नवीन बांधकामांची दरवर्षी डिसेंबर महिन्यात पुरवणी पाहणी केली जाणार आहे. याद्वारे नगरपालिकेच्या कर उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे.

बजेटमध्ये गुणात्मक विकासकामांना प्राधान्य देण्यात आले असून यामध्ये नवीन पाणीपुरवठा योजना, कृष्णा नदी संवर्धन योजना, कृष्णा नदीवर नवीन पर्यायी पूल, भुमिगत गटर योजना, मध्यवर्ती दुमजली पार्किंग ही विकास कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. माझी वसुंधरा योजना (5 लाख), महिला व बालकल्याण योजना (10 लाख), दिव्यांग कल्याण योजना (10 लाख) व दुर्बल घटक निधी (10 लाख) या कल्याणकारी योजनांसाठी तरतूद करण्यात आली आहे. पर्यावरणपूरक उपक्रम राबवणार्‍या मिळकतधारकांना घरपट्टीत सूट देण्याचा निर्णय जाहीर करून मुख्याधिकार्‍यांनी वाईकरांना दिलासा दिलेला आहे.

हा अर्थसंकल्प पर्यावरणाचे संवर्धन करणारा तसेच विकास कामांना प्राधान्य देणारा असल्याचे मुख्याधिकारी यांनी सांगितले. या बैठकीस कार्यालय अधिक्षक नारायण गोसावी, बांधकाम अभियंता सचिन धेंडे, नगररचनाकार निनाद जगताप, करनिरिक्षक अभिजीत ढाणे, पाणीपुरवठा अभियंता क्रांती वाघमळे, आस्थापना प्रमुख दिपाली साबळे उपस्थित होते.

पर्यावरणपूरक उपक्रम राबवणार्‍या मिळकतधारकांना घरपट्टीत सूट

शहरात आपल्या इमारतीवर रेनवॉटर हार्वेस्टिंग, सौरउर्जा व इतर अपारंपरिक ऊर्जेचा वापर करणारे, घरगुती कम्पोस्ट खत बनवणारे मिळकतधारक तसेच घरगुती किंवा व्यावसायिक वापरामध्येही इलेक्ट्रीक वाहनाचा वापर करणारे मिळकतधारक यांना घरपट्टीमध्ये सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला असून 1 एप्रिलपासून अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी तथा प्रशासक किरणकुमार मोरे यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT