सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील ‘गावठाण’ घोषित करण्याचा कार्यक्रम मार्च ते जुलै दरम्यान | पुढारी

सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील ‘गावठाण’ घोषित करण्याचा कार्यक्रम मार्च ते जुलै दरम्यान

सिंधुदुर्ग पुढारी वृत्तसेवा: जिल्ह्यात सध्या 32 गावांमध्ये गावठाणे घोषित करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील ज्या गावांमध्ये 15 किंवा त्यापेक्षा जास्त घरे ज्या क्षेत्रात आहेत, ते क्षेत्र गावठाण क्षेत्र म्हणून घोषित करण्यासाठी मार्च ते जुलै 2022 या पाच महिन्यांत गावठाण घोषित करण्याचा कालबद्ध कार्यक्रम करण्याविषयी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी अधीक्षक भूमीअभिलेख, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना पत्र दिले आहे.

या पत्रात म्हटले आहे, पहिल्या टप्प्यात ज्या गावांची लोकसंख्या दोन हजार किंवा त्याजवळ आहे, अशा गावांची स्थळ पाहणी करून ज्या भागामध्ये, वाडा-वस्ती किंवा तांडे तसेच तोल, पाडे यामध्ये 15 किंवा जास्त घरे असलेल्या क्षेत्रास गावठाण घोषित करायचे ठरवले आहे. हे गावठाण क्षेत्र ठरविताना ज्या सर्व्हे नंबर, गट नंबरमध्ये लोकसंख्या, घरवस्ती आहे. त्या क्षेत्राचा गावठाण क्षेत्रामध्ये समावेश करावा.

जिल्ह्यात यापूर्वी ग्रामपंचायत हद्दीतील एकूण 32 गावांमध्ये गावठाणे घोषित करण्यात आली आहेत. त्यापैकी 7 गावठाणे बिननंबरी, तर 25 गावठाणे नंबरी आहेत. परंतु, उर्वरित गावात गावठाणे घोषित करण्यात आलेली नाहीत, अशा गावांना गावठाणे घोषित करण्याचे प्रस्तावित आहे.

गावठाण घोषित केल्यामुळे तेथे राहणार्‍या नागरिकांना बिनशेती परवानगी, घरबांधणी आदी कार्यवाहीमध्ये सुलभता येणार आहे. तसेच, गावठाण घोषित झाल्यानंतर स्वामित्व योजनेंतर्गत त्या भागांची, गावठाणांची सविस्तर मोजणी ड्रोनद्वारे अथवा भविष्यात उपलब्ध होणार्‍या रोवर तंत्रज्ञानाद्वारे करून नागरिकांना त्यांचे मालकी हक्काची मिळकत पत्रिका व नकाशा देखील उपलब्ध करून होणार आहे.

मार्च ते जुलै 2022 या कालावधीत होणार्‍या या कार्यक्रमात प्रत्येक महिन्यात तालुक्यातील एकूण गावांतील 20 टक्के गावात गावठाणे घोषित करण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात यावी. त्याचा अहवाल दर महिन्याच्या 4 तारखेला उपविभागीय अधिकारी यांनी पाठवायचा आहे.

गावठाण जाहीर करावयाच्या गावांची स्थळ पाहणी करण्यासाठी भूमी अभिलेख कर्मचारी, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, पोलिसपाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, सदस्य यांचे पथक तयार करण्यात येणार आहे.

हेही वाचा

Back to top button