सातारा

महापुरुषांच्या शाळा होणार आयडॉल

Shambhuraj Pachindre

सातारा : विशाल गुजर

देशाच्या उभारणीत ज्या महापुरुषांनी योगदान दिले, त्यांनी ज्या प्राथमिक शाळेत अभ्यासाचे धडे गिरवले, त्या शाळा आता आयडॉल होणार आहेत. शालेय शिक्षण विभागाने यासंदर्भात एक योजना आखली आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात त्यासाठी भरीव तरतूद केली जाणार आहे. दहा महापुरुषांनी शिक्षण घेतलेल्या शाळांचा विकास करण्याचा प्रस्ताव पहिल्या टप्प्यात तयार झाला आहे. यामध्ये सातार्‍यातील प्रतापसिंह हायस्कूल व नायगावच्या सावित्रीबाई फुले या शाळांचा समावेश करण्यात आला आहे.

सामाजिक सलोखा, लोकशाही अन् मानवतावाद या मूलमंत्रासोबतच देशाच्या स्वातंत्र्यात योगदान असलेल्या महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या महापुरुषांच्या शाळांचा विकास करण्याचा सरकारचा मानस आहे. त्या अनुषंगानेच या महापुरुषांच्या शाळा आधुनिक होतील. या शाळांची स्वतंत्र इमारत असेल. तसेच महापुरुषांचा इतिहास आणि विचार सांगणारे संग्रहालय असणार आहे.

शैक्षणिक क्रांती घडवणार्‍या सावित्रीबाई फुले यांच्या नायगाव या जन्मगावी असणारी शाळा आयडॉल होणार आहे. तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे कैवारी व राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून त्यांचे योगदान मोठे आहे. ते सातार्‍यातील ज्या छत्रपती प्रतापसिंह हायस्कूलमध्ये शिकले, त्या शाळेचाही विकास राज्य सरकारमार्फत केला जाणार आहे. त्यामुळे या दोन शाळांचे भाग्य उजळणार आहे.

ही संकल्पना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मांडली आहे. या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही मान्यता दिली आहे. दरम्यान, अर्थसंकल्पात या दहा शाळांसाठी आर्थिक तरतूद होणार आहे.

पहिल्या टप्प्यात या महापुरुषांच्या शाळा विकसित केल्या जाणार

राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, महर्षी धोंडो केशव कर्वे, साने गुरुजी, सावित्रीबाई फुले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा महाराज, क्रांतिसिंह नाना पाटील

शालेय शिक्षण विभागाने घेतलेला निर्णय ऐतिहासिक आहे. यामुळे भविष्यात नव्या पिढीसमोर महापुरुषांचा आदर्श उभा राहणार आहे. अर्थसंकल्पात यात निधीची तरतूद होण्याची शक्यता आहे. शाळा विकसित झाल्यास पर्यटनात भर पडणार आहे.
– प्रवीण शिंदे,
अभिरक्षक, छत्रपती शिवाजी संग्रहालय

SCROLL FOR NEXT