सातारा

जो शहीद हुए है उनकी जरा याद करो कुर्बानी…कारगिलमध्ये साताऱ्यातील ५ जवानांचे बलिदान

Shambhuraj Pachindre

सातारा, पुढारी वृत्तसेवा : भारत आणि पाकिस्तानमध्ये 1999 साली झालेल्या कारगिल युद्धात जिल्ह्यातील नाईक नारायण साळुंखे (अनपटवाडी), सुभेदार कृष्णात घाडगे (पिरवाडी), शिपाई महादेव निकम (देगाव), शिपाई शशिकांत शिवथरे (कळंबे), शिपाई गजानन मोरे (भुडकेवाडी) यांनी देशासाठी बलिदान दिले. भारताने राबवलेले 'ऑपरेशन विजय' ही मोहीम जवानांनी फत्ते करून पाकिस्तानला धूळ चारली. प्राणांचे बलिदान देऊन भारतमातेचे संरक्षण करणार्‍या या वीर जवानांचे स्मरण अमृत महोत्सवी वर्षात होत आहे.

भारताचे भौगोलिक स्थान वैशिष्ट्यपूर्ण राहिले आहे. तिन्ही बाजूला समुद्र आणि एका बाजूला हिमालय अशा भौगोलिक रचनेने भारताचे संरक्षण केले आहे. मात्र तरीही या भारतभूमीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने अनेकदा केला. उत्तरेकडील कारगिल, लेह, लडाख परिसरात पाकिस्तानी सैनिकांनी पर्वतीय प्रदेशासह मोक्याच्या ठिकाणी कब्जा केला, बंकर बांधले. पाकिस्तानने मे 1999 मध्ये भारतासोबत युद्धाला सुरुवात केली. पाकिस्तानच्या या घुसखोरीला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने 'ऑपरेशन विजय' राबवले. पाकिस्तानी सैन्याने भारताचा बराच भूप्रदेश बळकावला होताच; पण त्याचबरोबर सियाचीन ग्लेशियरही ताब्यात घ्यायचा मनसुबा पाकड्यांचा होता. भारतीय सैनिकांना उंच पर्वतावरील शत्रूचा मुकाबला करताना अनेक अडचणी येत होत्या. अशा खडतर परिस्थितीतही भारतीय सैनिकांनी पाकिस्तानी सैन्याला चारी मुंड्या चीत केले.

देशाच्या संरक्षणासाठी सातारा जिल्ह्याचे नेहमीच योगदान राहिले आहे. कारगिल युद्धात जिल्ह्यातील पाच जवानांनी प्राणांची आहुती दिली. नाईक नारायण साळुंखे (अनपटवाडी, ता. कोरेगाव), सुभेदार कृष्णात घाडगे (पिरवाडी, ता. सातारा), शिपाई महादेव निकम (देगाव, ता. सातारा), शिपाई शशिकांत शिवथरे (कळंबे, ता. वाई), शिपाई गजानन मोरे (भुडकेवाडी, ता. पाटण) हे कारगिल युद्धात देशासाठी शहीद झाले. देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त या शहिदांचे, वीर सुपुत्रांचे स्मरण होत आहे. 'जो शहीद हुए है उनकी जरा याद करो कुर्बानी', अशा शब्दांत जिल्हावासीयांकडून भावना व्यक्‍त होत आहेत.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT