जि.प. अधिकार्‍यांचा आता ग्रामपंचायतीत मुक्काम Pudhari File Photo
सातारा

ZP Officers Village Stay | जि.प. अधिकार्‍यांचा आता ग्रामपंचायतीत मुक्काम

दर बुधवारी वरिष्ठ अधिकारी गावात : कामकाजाची करणार तपासणी

पुढारी वृत्तसेवा

सातारा : सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमध्ये मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानाला गती देण्यासाठी व लोकसहभाग वाढवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्व खातेप्रमुखांनी दर बुधवारी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये मुक्काम करून ग्रामपंचायतीच्या कामकाजासह योजनांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमध्ये मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानाची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून हा उपक्रम राबवला जाणार आहे. मुक्कामादरम्यान हे अधिकारी ग्रामस्थांशी संवाद साधून प्रबोधन करणार आहेत. शासनाच्या विविध योजना आणि ग्रामपंचायतीच्या जबाबदार्‍याबद्दल ग्रामस्थांना माहिती देणार आहेत. तसेच लोकसहभागासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. ग्रामपंचायतीच्या दप्तरांची अभियानाच्या अनुषंगाने तपासणी केली जाणार आहे.

पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य, कृषीची गावामध्ये प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी होत आहे याची पाहणी केली जाणार आहे. ग्रामस्थांच्या वैयक्तीक व सार्वजनिक समस्या ऐकून घेण्यात येणार आहेत. शक्य असल्यास जागेवरच त्याचे निराकरण केले जाणार आहे. अधिकारी आपल्या स्तरावर शक्य नसलेल्या समस्यांची नोंद घेवून पुढील कार्यवाहीसाठी अहवाल सादर करणार आहेत. गावात सुरु असलेल्या किंवा प्रस्तावित असलेल्या विकास कामांची गुणवत्ता व प्रगती तपासली जाणार आहे. मुक्काम संपल्यानंतर गुरूवारी सकाळी 11 वाजेपर्यंत मुक्कामाचा सविस्तर अहवाल, कार्यवाही, निरीक्षणे सामान्य प्रशासन विभागाकडे अधिकारी सादर करणार आहेत.

खातेप्रमुखांनी मुक्कामाच्या ठिकाणच्या गावांतील समस्यांची नोंद न घेता ग्रामपंचायतीच्या चांगल्या कामाची व अभिनव उपक्रमाची देखील नोंद घ्यावी. बुधवारी सायंकाळी 5 वाजता प्रत्यक्ष गावात उपस्थित राहून कामकाज करावे. गावातील ग्रामस्थांचा लोकसहभाग घेवून अभियानविषयक श्रमदान मोहीम राबवावी.
याशनी नागराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. सातारा

गटविकास अधिकारी करणार गावांची निवड...

पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍यांकडून दर आठवड्यात मुक्कामासाठीच्या गावाची निवड करून त्यांची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाला देण्यात येणार आहे. त्यानंतर हे अधिकारी संबंधित गावात मुक्कामसाठी येणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT