

सातारा : सातारा पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रशासनाच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सदरबझारमधील प्रभाग क्र. 3 ब ही जागा सर्वसाधारण (महिला) यासाठी राखीव आहे. तरीही या प्रभागातील अधिकृत यादीत पुरुषाचे नाव उमेदवार म्हणून नोंदवण्यात आले. खा. उदयनराजे गटाच्या उमेदवाराबाबत हा धक्कादायक प्रकार घडल्यामुळे सदरबझारमधील कार्यकर्त्यांमध्ये खळबळ माजली आहे. विशेष म्हणजे छाननीनंतर घडलेल्या या धक्कादायक प्रकारामुळे नगरपालिकेच्या निवडणूक विभागाच्या पारदर्शकतेवर संशयाचे ढग जमले आहेत.
सातारा पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची धामधूम सुरू आहे. उमेदवार व कार्यकर्त्यांमध्ये अभूतपूर्व उत्साह संचारला आहे. मात्र, पालिकेच्या निवडणूक विभागाच्या कारभारामुळे या उत्साह व आनंदावर विरजण पडले. निवडणूक प्रक्रियेवर जनतेच्या मनात अविश्वास असताना साताऱ्यात घडलेल्या एका प्रकाराने आणखी संशय वाढला आहे.
साताऱ्यातील प्रभाग क्र. 3 ब या प्रभागातून सर्वसाधारण (महिला) या राखीव प्रवर्गातून खा. उदयनराजे गटातून जयश्री सुभाष जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. खबरदारी म्हणून त्यांनी पक्षातून व अपक्ष असे दोन उमेदवार अर्ज सोमवारी भरले. मंगळवारी झालेल्या छाननी प्रक्रियेत जयश्री जाधव यांचा एक उमेदवरी अर्ज पक्षाचा एबी फॉर्म उशिरा दाखल केल्याने बाद झाला. मात्र, अपक्ष म्हणून भरलेला दुसरा अर्ज वैध ठरला. छाननी प्रक्रियेनंतर नगरपालिकेच्या निवडणूक विभागाने अर्ज वैध ठरलेल्या उमेदवारांची प्रभागनिहाय अधिकृत यादी प्रसिद्ध केली. त्यावेळी या यादीत प्रभाग क्र. 3 ब मधून उमेदवारी दाखल केलेल्या सहा महिलांची नावे होती. मात्र, एक पुरूषी नाव ‘जयसिंग सुभाष जाधव’ असे प्रसिद्ध केले. त्यानंतर जयश्री सुभाष जाधव यांचे नाव कुठेच दिसत नसल्याने सदरबझारमधील खा. उदयनराजे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये खळबळ माजली. नेमका काय प्रकार झाला हे कुणाच्याच लक्षात येईना. ही यादी सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.
त्यानंतर भाजपचे शहराध्यक्ष विकास गोसावी यांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी नगरपालिकेच्या निवडणूक विभागाचे याकडे लक्ष वेधले. निवडणूक विभागाने प्रसिद्ध केलेल्या उमेदवारांच्या अधिकृत यादीत महिला उमेदवाराचे नाव जयसिंग सुभाष जाधव असे नोंदवले गेल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले. महिला राखीव प्रभागात ‘जयसिंग’ नावाचा उमेदवार पाहून कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली. गोसावी यांनी ही गंभीर त्रुटी तातडीने निदर्शनास आणून दिल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी शुद्धीपत्रक काढू, असे सांगत हात वर केले. मात्र, प्राथमिक आणि इतक्या संवेदनशील प्रक्रियेत अशा प्रकारच्या चुकांनी प्रशासनाच्या दक्षतेबद्दल संभ्रम निर्माण केला. यादीमध्ये नावाची एवढी गंभीर गफलत कशी झाली? काटेकोर छाननीशिवाय नावांची अंतिम यादी कशी झाली? हा प्रश्न यानिमित्ताने ऐरणीवर आला आहे.
निवडणूक विभागाकडून उमेदवारांच्या नावांची पडताळणी ही निवडणूक प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाची आणि पहिली पायरी असते. मात्र, साताऱ्यात या प्रक्रियेतच गंभीर चूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. महिला राखीव प्रभागात पुरुष उमेदवाराचे नाव बसवणे ही गंभीर बाब आहेच पण त्याचबरोबर निवडणूक प्रक्रियेतील बेजबाबदारी आणि बेपर्वाई असल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. यामुळे मतदार, नागरिकांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
निवडणूक विभाग उमेदवारांचे साधे नावही अचूक देऊ शकत नसेल तर पुढील प्रक्रिया काटेकोरपणे पार पडणार का? छाननी प्रक्रियेत घोटाळा तर केला नसेल ना? असा सवाल केला जात आहे. ही चूक मुद्रणदोष म्हणून न झटकता जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होऊ लागली आहे.