Drug Case Mastermind | ड्रग्ज प्रकरणाचा ‘मुखिया’ कोण? Pudhari File Photo
सातारा

Drug Case Mastermind | ड्रग्ज प्रकरणाचा ‘मुखिया’ कोण?

ओंकार डिगेला क्लिनचिट कशी? ; कारवाईत काळंबेरं असल्याचा संशय

पुढारी वृत्तसेवा

निलेश शिंदे

बामणोली : सावरी ता. जावली गावच्या हद्दीमध्ये सुरू असलेल्या ड्रग्ज फॅक्टरी कारवाईवरून स्थानिक पातळीवर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. दररोज हे प्रकरण नवनव्या वळणावर पोहोचत आहे. शनिवारी कारवाई झाल्यानंतर पुन्हा अ‍ॅन्टी नार्को टेस्ट टास्क फोर्स कोल्हापूर कृती विभाग पुणेच्या पथकाने केमिकल असलेले लिक्विड व अन्य साहित्य बुधवारी ताब्यात घेतले. त्यातच शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी केलेल्या आरोपामुळे हे प्रकरण आणखी गुंतागुंतीचे झाले. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार सूत्रधार असलेल्या ओंकार डिगेलाच मुंबई पोलिसांनी क्लिनचिट दिल्यामुळे सावरी, म्हावशी व बामणोली परिसरातील स्थानिकांनी यासंदर्भातील कारवाईच्या प्रक्रियेत काळंबेरं असल्याचा संशय व्यक्त करून या प्रकरणाचा मुखिया कोण? असा सवाल केला आहे.

सावरी येथील एमडी ड्रग्जच्या फॅक्टरीवर छापा टाकून 115 कोटींचे घबाड मुंबई पोलिसांनी शनिवारी जप्त केले होते. या प्रकरणाने राज्यात खळबळ उडवून दिली आहे. रोज नवनवे आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. एकीकडे सुषमा अंधारे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेवून लेटर बॉम्ब फोडला. सुषमा अंधारे यांनी या प्रकरणात थेट उप मुख्यमंत्र्यांचे बंधू प्रकाश शिंदे यांचे नाव घेतले. त्यामुळे या प्रकरणाचे गांभिर्य आणखी वाढले आहे. स्थानिक पातळीवरून या प्रकरणावरून जोरदार चर्चाही सुरू आहेत.

स्थानिकांच्या मते डिगे राजकीय आश्रयाशिवाय हे करू शकत नाही. मुंबई पोलिसांनी कारवाईची संपूर्ण माहिती देत ओंकार डिगे याचा या प्रकरणात सहभाग नसल्याचे जाहीर करून टाकले. गुरूवारी पुन्हा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेवून पोलिस तपासावर प्रश्नचिन्ह उभे केले. संबंधीत वाडा मालकाकडे मेढा पोलिसांनी पुन्हा चौकशी करून बामणोली, सावरी परिसरात डॉग स्कॉडने अंमली पदार्थ साठ्याच्या अनुषंगाने शोध मोहीमही राबवली होती. या सार्‍या घडामोडी घडत असताना स्थानिक बामणोली व सावरीतील नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चेला ऊत आला आहे.

ड्रग्ज ज्या ठिकाणी बनवले जात होते ती सावरीतील जागा गोविंद बाबाजी शिंदकर यांच्या नावे आहे. शिंदकर यांनी ही जागा ओंकार डिगे याच्यामार्फत दिली होती. असे असताना ओंकार डिगेला क्लिनचिट कशी मिळाली?, कारवाईवेळी डिगेकडे फक्त चौकशी सुरू होती तर त्याला बेड्या का घालण्यात आल्या होत्या? असे स्थानिक विचारत आहेत. शनिवारी कारवाई झाली त्यावेळी पोलिसांचा लवाजमा उपस्थित होता. त्यांनी सर्व साहित्य जप्त करून नेले होते तरीही चार दिवसानंतर पुन्हा लिक्विड व आणखी साहित्याचे गाठोडे सापडणे शंकास्पद असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

मेढा पोलिस तर या प्रकरणात ‘तो मी नव्हेच’ अशा अविर्भावात वावरत आहेत. कोणतीही माहिती त्यांच्याकडून दिली जात नसून आमच्याकडे तपास नाही, एवढेच ते वारंवार सांगत आहेत. गुरूवारी ताब्यात घेतलेले साहित्य त्यांच्याकडे जमा करण्यात येणार होते, ते केले गेले की नाही हेही सांगायला ते तयार नाहीत. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांमधील संभ्रमाचे वातावरण आणखी वाढत आहे. सुषमा अंधारे यांच्यानंतर संजय राऊत यांनीही प्रकाश शिंदे यांचे नाव घेवून त्यांच्यावर आक्षेप घेतले आहेत तर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सुषमा अंधारे यांच्या आरोपांना उत्तर देत एकनाथ शिंदे व प्रकाश शिंदे यांचा या प्रकरणाशी संबंध नसल्याचा खुलासा दिला आहे.

सामान्य जनतेला मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात जावली तालुक्यात ड्रग्ज आले कुठून? या सर्व ड्रग्ज माफियांचा पाठीराखा कोण आहे? याविषयी उलटसुलट प्रश्न पडत आहेत. जावलीसह सातारा जिल्ह्यातील युवा पिढीचे भवितव्य अंधारात घालणारा मुखिया कोण आहे? याची चर्चा जावली तालुक्यात सुरू आहे.

डिगेच्या नेटवर्कमध्ये कोण कोण?

ओंकार डिगेला आधी पकडले जाते. त्याला बेड्यात स्थानिकजण पाहतात. त्याचे फोटोही काढून ठेवतात. डिगेला पोलिस सोबत घेवूनही जातात. नंतर त्याला सोडून देतात. तो मोकाट सुटतो. पोलिसांच्या प्रेसनोटमध्येही त्याचे नाव येते. हा डिगे अनेक वर्षे ड्रग्जच्या पुड्या देत असल्याचे स्थानिक सांगतात. त्याच्या नेटवर्कमध्ये विशाल मोरे व सातार्‍यातला एकजण असल्याचे सांगितले जाते. विशाल मोरेचे व सातार्‍यातील एकाची तुरूंगात झालेली ओळख पुढे या नेटवर्कमध्ये रूपांतरित होते, असे सांगितले जाते. मात्र, या नेटवर्कला आश्रय कुणाचा आहे? कुणाच्या आशीर्वादाने हे सारे सावरीत सुरू होते याची जोरदार चर्चा सुरू आहे. सातारा जिल्ह्यातील तरूणांचे भविष्य उद्ध्वस्त करणार्‍या या टोळीचा छडा लावण्याची मागणी जावलीची जनता करत आहे.

हॉटेल तेज यश पुन्हा नव्याने चर्चेत

ज्या हॉटेलवरून गदारोळ उडाला आहे त्याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंधू प्रकाश शिंदे यांनी स्पष्टीकरण देत संबंधीत जागा सहा महिन्यापूर्वीच दरेचे सरपंच रणजित शिंदे यांना विकली असल्याचे सांगितले. याप्रकरणात हॉटेलचा काडीमात्र संबंध नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे. त्यामुळे संबंधित हॉटेल तेज यश नव्याने चर्चेत आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT