सातारा, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील उद्योजकांच्या नवीन प्रस्तावित औद्योगिक वसाहत, ग्रामपंचायत कर व मोठ्या उद्योगांची गुंतवणूक वाढावी यासाठी प्रयत्न करू. तसेच इतर प्रश्नाबाबत सातारा औद्योगिक वसाहत व मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा (मास) ला कार्यालयास लवकरच भेट देणार आहे. उद्योग विभाग संबंधित अधिकारी समवेत बैठक लावू असे आश्वासन उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांनी दिले.
अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या सातारा जिल्ह्याकरिता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक कार्यालय मंजूर केल्याबद्दल जिल्ह्यातील सर्व उद्योजक व मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा (मास) चे पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांच्यावतीने उद्योगमंत्री उदय सामंत यांचे आभार मानले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मास अध्यक्ष संजोग मोहिते, सचिव दीपक पाटील, माजी मास अध्यक्ष राजेंद्र मोहिते, धैर्यशील भोसले, चैतन्य सडेकर व बंडू ढमाळ उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यातील उद्योजकांच्या नवीन प्रस्तावित औद्योगिक वसाहत होणेबाबत, ग्रामपंचायत कर व जिल्ह्यामध्ये मोठ्या उद्योगांची गुंतवणूक वाढावी या महत्वपूर्ण विषयाबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. त्यावेळी मास कार्यालयास भेट देऊन याबाबत तोडगा काढू अशी ग्वाही ना. सामंत यानू दिली. तसेच विकास आयुक्त उद्योग विभाग, मुंबई यांच्या सोबत महाराष्ट्र शासनाचे औद्योगिक धोरण 2013 आणि 2019 मधील अंमलबजावणी संदर्भातील त्रुटींसंदर्भात चर्चा झाली आणि तसेच नवीन येऊ घातलेल्या औद्योगिक धोरणांसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आल्यानंतर त्यावर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले.