Nashik News | उद्योग भवनात मद्यपींचा 'रात्रीस खेळ चाले'

सुरक्षा वाऱ्यावर : भिंतीवरून उड्या मारून इमारतीत प्रवेश
Nashik News
उद्योग भवनात मद्यपींचा 'रात्रीस खेळ चाले'file photo
नाशिक : सतीश डोंगरे

उद्योगांशी संबंधित कार्यालयांसह बँक, इन्शुरन्स, हॉटेल्स व अन्य कार्यालये असलेले उद्योग भवन हे मद्यपींचा अड्डा ठरत आहे. वास्तविक, या ठिकाणी २४ तास सुरक्षारक्षक नेमलेले आहेत, मात्र अशातही मद्यपी रात्रीच्या वेळेस याठिकाणी पर्ट्या साजऱ्या करीत असल्याचे इमारतीतील गाळेधारकांचे म्हणणे आहे. तसेच इतरही प्रकार याठिकाणी चालत असल्यामुळे, इमारतीच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

सातपूर, आयटीआय सिग्नल येथील पाचमजली उद्योग भवनला एजन्सीमार्फत सुरक्षा व्यवस्था पुरविली जाते. दिवसा चार, तर रात्रीच्या वेळी एक सुरक्षारक्षक इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ तैनात असतो. उद्योगांशी निगडीत कार्यालयांबरोबरच बँक आणि एटीएम याठिकाणी असल्याने जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. मात्र, अशातही मद्यपींकडून इमारतीत प्रवेश करून रात्रीच्या वेळी पार्ट्या केल्या जात असल्यामुळे, या संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. इमारतीत मुख्य प्रवेशद्वाराव्यतिरिक्त अन्य ठिकाणांहून प्रवेश करणे सहज शक्य असल्याने मद्यपींचे फावते. इमारतीच्या चहुबाजूने असलेल्या भिंतीवरून मद्यपी इमारतीत प्रवेश करतात. ज्याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत, अशा ठिकाणी बसून रात्रीच्या वेळी बैठका झोडल्या जातात. इमारतीत सेन्सॉर कनेक्ट विद्युत व्यवस्था असल्याने, उजेडाचा प्रश्न निकाली निघत असल्याने मद्यपींच्या रात्री उशिरापर्यंत पार्ट्या रंगतात. याव्यतिरिक्त इतरही बरेच प्रकार इमारतीत घडत असल्याने उद्योग भवनाची सुरक्षा धोक्यात आली आहे.

आयटीआय विद्यार्थ्यांचे 'दम मारो दम'

इमारतीजवळच असलेल्या 'आयटीआय'चे विद्यार्थी उद्योग भवनामध्ये धूम्रपानासाठी येतात. अल्पवयीन असलेली ही मुले सर्रास धूम्रपान करताना दिसतात. उद्योग भवनामध्ये असलेल्या हॉटेल्सला या विद्यार्थ्यांनी आपला अड्डा केलेला असून, दिवसभर त्यांची याठिकाणी ये-जा असते. या व्यतिरिक्त काही कंपनी कार्यालयांमधील पुरुष व महिला कर्मचारी याठिकाणी धूम्रपानासाठी येत असल्याने, उद्योग भवन 'स्मोकिंग झोन' झाल्याच्या तक्रारी अनेक जण करीत आहेत.

अन्न प्रशासनाच्या दिव्याखाली अंधार

राज्यात गुटखाबंदी असून, त्याची अंमलबजावणी अन्न व औषध प्रशासनावर सोपविण्यात आली आहे. मात्र, ज्या ठिकाणी अन्न व औषध प्रशासनाचे मुख्य कार्यालय आहे, त्याच ठिकाणच्या अवतीभोवती गुटख्याची सर्रास विक्री होत आहे. उद्योग भवनाच्या पाचव्या मजल्यावर अन्न प्रशासनाचे कार्यालय असून, उद्योग भवनाच्या आजूबाजूला चार ते पाच पानटपऱ्या आहेत. त्या ठिकाणी गुटखा हमखास मिळत असल्याने, 'दिव्याखाली अंधार' अशी काहीशी गत अन्न प्रशासनाची झाली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news