कराड: कराड दक्षिण, कराड उत्तर आणि पाटण या तिन्ही विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदारांसह विरोधी पक्षाचे उमेदवार सोमवार, २८ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार बाळासाहेब पाटील, मनोज घोरपडे, सत्यजितसिंह पाटणकर, हर्षद कदम प्रामुख्याने यांचा यात समावेश आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सोमवार, २२ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे.
यापूर्वी गुरुवार, २४ ऑक्टोबरला कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून भाजपा उमेदवार डॉ. अतुल भोसले यांनी उमेदबारी अर्ज दाखल केला आहे. आता दक्षिणमधून माजी मुख्यमंत्री विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यापूर्वी या मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे नेते इंद्रजित गुजर यांच्यासह आठ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासाह त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपा नेते मनोज घोरपडे हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, मनाने घोरपडे हे सौ. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयापासून पदयात्रा काढणार आहेत, तर आमदार बाळासाहेब पाटील हे मंगळवार पेठेतून पदयात्रा काढणार आहेत.
तसेच अर्ज दाखल केल्यानंतर लिबर्टी मैदानावर त्यांची सभा होणार आहे. पाटण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार तथा पालकमंत्री शंभूराज देसाई हे सोमवारी सकाळी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. कारखाना कार्यस्थळावरून निवडक पदाधिकाऱ्यांना सोबत घेत मंत्री देसाई उमेदवारी अर्ज दाखल करणार असून त्यानंतर ते कार्यकर्त्यांना संबोधित करतील, असे सांगण्यात आले आहे. तर उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेले राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते सत्यजितसिंह पाटणकर हे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे उमदेवार हर्षद कदम हेही निवडक पदाधिका-यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
कराड शहरातील तहसील कार्यालयात कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी तर यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात कराड उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या दोन्ही मतदारसंघासाठी दिग्गज नेते उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याने मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते व पदाधिकारी एकत्रित येण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त सोमवारी तैनात असणार आहे.