सातारा : सागर गुजर
पुणे-बंगळूर महामार्गावरील महत्त्वाचा आणि वाहनचालकांसाठी नेहमीच आव्हान ठरणारा खंबाटकी घाटातील वळणावळणाच्या प्रवासाला आता कायमचा बाय-बाय मिळणार आहे. नवीन बोगद्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, बोगद्यातील गटर लाइनिंग आणि रोड काँक्रीटचे काम पूर्ण झाले आहे. सध्या वीज व्यवस्था, फायर फायटिंग यंत्रणा, सीसीटीव्ही तसेच इतर अत्यावश्यक सुरक्षा यंत्रणा बसवण्याचे काम वेगाने सुरू आहे. येत्या डिसेंबर महिन्यापासून पुण्याकडून साताऱ्याच्या दिशेने येणारी वाहने या बोगद्यातून येतील, त्यामुळे घाटातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा निकाली निघणार आहे.
खंबाटकी घाटातील या बोगद्यामुळे पुण्याच्या बाजूकडून साताऱ्याकडे येणाऱ्या वाहनांना घाटातील वळणावळणाचा आणि चढ-उताराचा मार्ग टाळता येणार आहे. सध्याच्या मार्गाच्या तुलनेत प्रवासाचे अंतर सुमारे सहा किलोमीटरने कमी होणार असून, वाहन धारकांचा प्रवासाचा वेळ सुमारे २० मिनिटांनी वाचणार आहे. त्यामुळे इंधनाचीही बचत होणार आहे.
बोगद्यामध्ये वाहनांच्या सुरक्षिततेला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीत वापरता याव्यात, यासाठी आवश्यक सुविधा उभारण्यात येत आहेत. बोगद्यात फायर फायटिंग यंत्रणा, सीसीटीव्ही कॅमेरे, वीज व्यवस्था आणि मॉनिटरिंग सिस्टीम बसवण्यात येत आहे. दोन्ही बोगद्यांवर एकाच ठिकाणाहून देखरेख ठेवता यावी, यासाठी स्वतंत्र मॉनिटरिंग व्यवस्था तयार करण्यात आली आहे. तसेच बोगद्यामध्ये आवश्यक ठिकाणी इंटरकनेक्शन, क्रॉसिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. एखाद्या बोगद्यात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास सुरक्षितपणे दुसऱ्या बोगद्यात जाण्यासाठी या सुविधेचा उपयोग होणार आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी डिसेंबर २०२६ पर्यंत खंबाटकी घाटातील साताऱ्याच्या दिशेने येणारा बोगदा वाहतुकीसाठी खुला करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार बोगद्याचे बहुतांश बांधकाम पूर्ण झाले असून, आता विद्युत व सुरक्षा यंत्रणांची कामे अंतिम टप्प्यात आहेत. येत्या डिसेंबरपर्यंत बोगदा वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन आहे. बोगदा सुरू झाल्यानंतर पुणे ते सातारा प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सोयीस्कर होण्यास मोठी मदत होणार आहे.
- सचिन गौतम, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण