Karad Accident : वाठारनजीक अपुऱ्या बॅरिकेटिंगचा बळी; दुचाकीस्वार तरुण ठार

महामार्गावरील धोकादायक डायव्हर्शन; दिशादर्शक फलक, सुरक्षाव्यवस्थेअभावी अपघाताचा आरोप
Accident
Accidentfile photo
Published on
Updated on

कराड : पुणे-बेंगळुरू महामार्गावरील वाठार, ता. कराड गावच्या हद्दीत रस्त्याच्या कामासाठी करण्यात आलेल्या अपुऱ्या बॅरिकेटिंग व दिशादर्शक फलकांच्या अभावामुळे दुचाकीस्वाराचा अपघात होऊन मृत्यू झाल्याची घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली. या अपघातास रस्त्याच्या कामातील निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा आरोप करत संबंधित ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांविरोधात कराड तालुका पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सुरज ऊर्फ नुरमोहम्मद लियाकत शेख (वय ३०, रा. परळी, ता. जि. सातारा) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत मयत सुरज यांचा चुलतभाऊ समीर शौकत शेख (वय ३८, रा. परळी, ता. जि. सातारा) यांनी कराड तालुका पोलिसांत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १४ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे १.३० वाजता सुरज ऊर्फ नुरमोहम्मद हा मोटारसायकलवरून वाळवा, जि. सांगली येथे पत्नी व मुलांना भेटण्यासाठी गेला होता. तेथून तो पुणे-बंगळूर महामार्गावरून परळी येथे परतत होता. वाठार गावच्या हद्दीत आल्यानंतर रस्त्याच्या कामासाठी पडलेल्या वाळूच्या ढिगाऱ्यावरून त्याची दुचाकी घसरली.

या अपघातात सुरज गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी हलविण्यात आले; मात्र त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, रस्त्याचे काम करणाऱ्या डी. पी. जैन कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांनी डायव्हर्शन केलेल्या ठिकाणी वाहन चालकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या नव्हत्या. अपघाताच्या ठिकाणी योग्य बॅरिकेटिंग तसेच दिशादर्शक फलक नसल्याने दुचाकीस्वाराचा अपघात झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

महामार्गावरील सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी रात्रीच्या वेळी वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक प्रकाश योजना, बॅरिकेटिंग आणि दिशादर्शक फलक असणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी कराड तालुका पोलिसांनी तक्रार दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news